'स्किन ट्रीटमेंट' घेण्याआधी स्पेशालिस्टची डिग्री पाहिली का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:30 IST2025-11-18T15:29:15+5:302025-11-18T15:30:45+5:30
Nagpur : एखादी समस्या उद्भवल्यास बरेच लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी इंटरनेट किंवा घरगुती उपाय शोधतात. टीव्हीवरच्या जाहिराती पाहून किंवा मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यानुसार क्रीम्स, लोशन्स वापरतात.

Did you check the specialist's degree before getting a 'skin treatment'?
नागपूर : आजकाल सौंदर्य आणि त्वचा चांगली ठेवण्याकडे कल वाढला आहे. चेहऱ्यावरचा पुरळ, खाज किंवा त्वचेची समस्या असली तरी लगेच 'स्किन स्पेशालिस्ट'च्या शोधात असतात; घाईत उपचार करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रताही तपासली जात नाही.
मनानेच 'स्कीनकेअर' करणे ठरू शकते घातक
एखादी समस्या उद्भवल्यास बरेच लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी इंटरनेट किंवा घरगुती उपाय शोधतात. टीव्हीवरच्या जाहिराती पाहून किंवा मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यानुसार क्रीम्स, लोशन्स वापरतात. प्रत्येक त्वचेचा प्रकार आणि समस्येचे स्वरूप वेगळे असते. त्यामुळे, कोणतेही रसायन किंवा उपचार स्वतःहून करणे त्वचेसाठी अत्यंत घातक ठरू शकते.
चुकीच्या उपचाराने समस्या
अनेक ठिकाणी सलून, ब्युटी पार्लर किंवा अगदी तीन महिन्यांचा कोर्स केलेल्या लोकांकडून त्वचेवर उपचार केले जातात. या चुकीच्या उपचारांमुळे समस्या कमी होण्याऐवजी ती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे, त्वचेवर कोणताही उपचार योग्य त्वचारोग डॉक्टरांकडूनच घ्या, असा सल्ला विदर्भडर्मेटोलॉजीकल सोसायटीच्या माजी सचिव व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांनी दिला आहे.
स्किन ट्रीटमेंट घेण्यासाठी आधी काय पाहाल ?
त्वचेवर उपचार घेण्यापूर्वी उपचार करणारा व्यक्ती 'एमबीबीएस' आणि त्यानंतर त्वचारोग या विषयात 'एमडी' किंवा 'डीएनबी' (त्वचारोग) पदवीधारक आहे का, हे तपासावे. त्या डॉक्टरची वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी आहे की नाही, हे पाहावे.
त्वचा बिघडल्यानंतर गाठतात डॉक्टर
चुकीच्या ठिकाणी उपचार घेतल्यामुळे जेव्हा त्वचा लाल होते, सूज येते, पुरळ वाढते किंवा चेहऱ्यावर डाग पडतात, तेव्हा लोक घाबरून खऱ्या त्वचारोगतज्ज्ञांना गाठतात. यावेळी उपचारांमध्ये झालेल्या चुका सुधारणे आणि त्वचेला पूर्ववत करणे कठीण होते.
'स्किन स्पेशालिस्ट' खरोखरच तज्ज्ञ आहेत का?
'स्किन स्पेशालिस्ट' ही संज्ञा वापरणारे अनेकजण योग्य पदवीधारक नसतात. केवळ तीन ते सहा महिन्यांचा ब्युटी कोर्स केलेले लोकही स्वतःला 'स्किन स्पेशालिस्ट' किंवा 'ब्युटी एक्स्पर्ट' म्हणून बाजारात उभे करतात. योग्य वैद्यकीय पदवी नसलेल्या व्यक्तीकडून लेझर, केमिकल पीलिंग किंवा इतर गुंतागुंतीचे उपचार घेतल्यास त्वचेवर कायमस्वरूपी दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. फक्त त्वचारोगतज्ज्ञ हेच त्वचेच्या सर्व रोगांचे आणि सौंदर्यात्मक उपचारांचे अधिकृत तज्ज्ञ असतात.
सलून, ब्युटीपार्लर, डेंटलमध्येही त्वचेवर उपचार
सध्या सलून, ब्युटी पार्लर आणि काही डेंटिस्टच्या क्लिनिकमध्येही त्वचेवरील उपचार उदा. हेअर रिमूव्हल लेझर, पीलिंग, फिलर्स आदी दिले जात आहेत. या ठिकाणी उपचार करणाऱ्या व्यक्तींकडे त्वचेच्या शरीररचना आणि रोगांचे सखोल वैद्यकीय ज्ञान नसते. उपचारादरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो.
"त्वचेवर कोणताही उपचार करण्यापूर्वी, उपचार करणाऱ्या व्यक्तीची डिग्री आणि वैद्यकीय नोंदणी तपासावी. कॉस्मेटोलॉजी कोर्स केलेले लोक त्वचेच्या रोगांवर उपचार करू शकत नाहीत. चुकीचे उपचार जीवावर बेतणारे किंवा कायमस्वरूपी नुकसान करणारे ठरू शकतात. त्वचेची काळजी घेताना, केवळ अधिकृत डॉक्टरांवरच विश्वास ठेवावा."
- डॉ. श्रद्धा महल्ले, माजी सचिव विदर्भडर्मेटोलॉजीकल सोसायटी