‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 22:24 IST2026-04-10T22:22:53+5:302026-04-10T22:24:53+5:30
अभिनेता रणवीर सिंग याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
-योगेश पांडे, नागपूर
Ranveer Singh Mohan Bhagwat: धुरंधर चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला अभिनेता रणवीर सिंग शुक्रवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीत त्याने सरसंघचालकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. रणवीर सिंग सव्वा चार नागपुरात होता व त्याचा दौरा अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता हे विशेष.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता रणवीर सिंगचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्याच्यासोबत आणखी चार जण होते.
स्मृतिमंदिर परिसराला भेट
तेथून रणवीर व त्याच्या सहकाऱ्यांनी थेट महालातील संघ मुख्यालय गाठले. तेथे त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रणवीरने त्याच्या चित्रपटाबाबत माहिती दिली. तसेच संघाची प्रणाली व विविध सेवाकार्यांबाबतदेखील जाणून घेतले.
जवळपास दीड तास तो संघ मुख्यालयात होता. त्यानंतर तो रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात गेला. तेथे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्याने तेथील संघ पदाधिकाऱ्यांशीदेखील संवाद साधला.
भेटीबद्दल गुप्तता
त्याने संघप्रणित चित्रभारती या संघटनेबाबतदेखील जाणून घेतले. त्यानंतर तो थेट नागपूर विमानतळाकडे रवाना झाला. रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघाला. त्याची ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती.
एकीकडे धुरंधर विक्रमांवर विक्रम करत असताना दुसरीकडे बॉलिवूडमधून मात्र चित्रपटाची हवी तशी प्रशंसा होत नसल्याबाबत नेटिझन्स व चित्रपट रसिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशा स्थितीत रणवीरने सरसंघचालकांची भेट घेतल्याने विविध कयास वर्तविण्यात येत आहे.
संघाच्या शताब्दी निमित्त विजयादशमीला रणवीर सिंगने व्हिडीओ जारी करत संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. मागील शंभर वर्षात संघाने जे कार्य केले त्यासाठी मी धन्यवाद देतो व पुढील काळातदेखील संघाचे काम सन्मान व प्रेरणेने युक्त असेल अशी भावना व्यक्त केली होती.