बारावीच्या निकालात 'फर्स्ट क्लास' अन् 'डिस्टिक्शन'चा उतरता ग्राफ
By योगेश पांडे | Updated: May 6, 2025 11:12 IST2025-05-06T11:10:16+5:302025-05-06T11:12:15+5:30
विभागातून केवळ ५.२९ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण : 'फर्स्ट क्लास'चा टक्कादेखील फिका

Descending graph of 'First Class' and 'Distinction' in Class 12th results
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या निकाल यंदा विभागासाठी फारसा चांगला राहिला नाही. विशेषतः प्रावीण्य श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा घटली आहे. दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का मागील वर्षीच्या तुलनेत मागे आहे. जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. मागील वर्षी हाच आकडा ३७ टक्के इतका होता, तर प्रावीण्य श्रेणीतील निकालात १.७१ टक्क्यांनी घट झाली असून, केवळ ५.२९ टक्के विद्यार्थीच ७५ टक्के गुणांचा आकडा ओलांडू शकले आहेत.
यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर विभागातील विद्यार्थ्यांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदा १.७१ टक्क्यांनी प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थी घटले. २०२४ चा अपवाद वगळला, तर २०२१ पासून प्रावीण्य श्रेणीच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे. २०२१ मध्ये, तर ४५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. यंदा केवळ ७हजार ९५५ विद्यार्थ्यांना 'डिस्टिंक्शन' मिळाले आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ५१ हजार १२० पैकी १ लाख ३६ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी द्वितीय श्रेणीत ६९ हजार ४८८ विद्यार्थी (४५.९८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी ४४.८७ टक्के विद्यार्थी या श्रेणीत होते.
'फर्स्ट क्लास' का घटला ?
मागील वर्षी २७.०१ टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्के ते ७५ टक्क्यांच्या मध्ये गुण मिळाले होते. मात्र, यात यंदा सात टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
यावेळच्या निकालात ३० हजार २६४ म्हणजेच २०.०३ टक्के विद्यार्थी 'फर्स्ट क्लास'मध्ये आले आहेत. एकीकडे प्रवेश परीक्षांकडे ओढा वाढत असताना, 'फर्स्ट क्लास'चा टक्का का घटला यावर महाविद्यालयांकडून मंथन करण्याची आवश्यकता आहे.
श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी (टक्क्यांमध्ये)
श्रेणी २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१
प्रावीण्य ५.२६ ७.०९ ४.९० १३.९० ४६.६९
प्रथम २०.०३ २७.०१ २३.६१ ३९.२० ४५.३६
द्वितीय ४५.९८ ४४.८७ ५१.९१ ३८.३९ ७.४९
केवळ उत्तीर्ण १९.२५ १३.१५ १९.४७ ५.०६ ०,०८
अनुत्तीर्ण ९.४७ ७.८८ ९.६५ ३.४६ ०.३८