कारागृहात असलेले उपसंचालक नरड, नाईक आता सायबर पोलिसांच्या ताब्यात
By योगेश पांडे | Updated: April 17, 2025 22:59 IST2025-04-17T22:59:12+5:302025-04-17T22:59:29+5:30
शालार्थ प्रणालीतील गैरप्रकारातील मोठे खुलासे होण्याची शक्यता

कारागृहात असलेले उपसंचालक नरड, नाईक आता सायबर पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक उल्हास नरड, तसेच वरिष्ठ लिपीक सूरज नाईक यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. मुख्याध्यापक बोगस मान्यता प्रकरणात हे दोघेही कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची दोन दिवस कसून चौकशी करण्यात येणार आहे व त्यातून शालार्थ प्रणालीतील गैरप्रकारातील मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार केली. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी उपसंचालक कार्यालयाने २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. यातील ३१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या‘शालार्थ आयडीं’ना उपसंचालक कार्यालयाने मान्यता दिली होती. उर्वरित ‘शालार्थ आयडी’ची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते. नरडलाच अपात्र मुख्याध्यापकाचा ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांना नरड व नाईक यांचा ताबा हवा होता. पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर दोघांनाही ताब्यात घेतले.
नरडच्या पासवर्डचा गैरवापर झालाच कसा
सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार झाली होती. ‘शालार्थ आयडी’ निर्माण करण्याचा अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याने गैरवापर करून ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. मात्र नरडच्या पासवर्डचा त्यांच्या माहितीशिवाय गैरवापर झालाच कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या दिशेने सविस्तर चौकशी करणार आहेत.