'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत' महसूलमंत्री बावनकुळेंचा दावा
By योगेश पांडे | Updated: November 20, 2025 18:37 IST2025-11-20T18:37:12+5:302025-11-20T18:37:42+5:30
Nagpur : गृहमंत्र्यांसोबत प्रशासकीय समन्वयासाठी शिंदेंची भेट

'Deputy Chief Minister Eknath Shinde is not angry' claims Revenue Minister Bawankule
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजिबात नाराज नाहीत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट ही विजयाची रणनिती आखण्यासाठी व प्रशासकीय समन्वयासाठी घेतल्याचा दावा केला आहे. ते नागपुरात शुक्रवारी बोलत होते.
अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट नाराजीवरून नव्हती. त्यांच्या भेटीत महायुती ५१ टक्के मतांनी जिंकावी यावर चर्चा झाली. मी स्वतः दोन दिवसांपूर्वी एकनाथजी शिंदे यांना भेटलो. ते कुठेही नाराज नव्हते. रालोआतील नेते नियमितपणे एकमेकांना भेटत असतात. महायुतीने ५१ टक्के मतांनी विजय मिळवावा, यासाठीच ही चर्चा झाली, असे बावनकुळे म्हणाले.
समन्वय समितीने एकमेकांच्या पक्षातील प्रवेश टाळण्याचे ठरवले असले, तरी उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्ते पक्ष बदलतात. माझ्या कामठी मतदारसंघातही असेच झाले. त्यामुळे महायुतीत काही गडबड आहे असे म्हणता येणार नाही. उमेदवारी न मिळाल्यानंतर कार्यकर्ते हालचाल करतात. या बाबतीत एकनाथ शिंदे अमित शहांकडे जाण्याची शक्यता नाही. तक्रारी असल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नाही तर माझ्याकडे येतील, असेदेखील त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
साठ लाख कुटुंबांना दिलासा
रीडेव्हलपमेंटमध्ये ६०० स्क्वेअर फुटांपर्यंत घर मिळाल्यास मुद्रांक शुल्क लागू होणार नाही. तसेच १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची तुकडेबंदीतील बांधकामे नियमित करण्यात येणार असून साठ लाख कुटुंबांना याचा फायदा मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. फ्लॅट नोंदणीसाठी ‘व्हर्टिकल सातबारा’ प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
वडेट्टीवार-पटोले-केदारांमध्ये समन्वय नाही
यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर टीका केली. वडेट्टीवार–पटोले–केदार यांच्यात समन्वयच नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. २०२९ मध्ये काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात छोटा पक्ष ठरेल असे ते म्हणाले.