थंडी वाढली असतानाच विजेची मागणी घटली ; राज्यात 'सरप्लस' वीज, १३ युनिट बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:36 IST2025-11-13T15:34:37+5:302025-11-13T15:36:14+5:30
Nagpur : परळी केंद्र ठप्प, कमी उत्पादन खर्चाच्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य

Demand for electricity drops as cold weather sets in; 'Surplus' electricity in the state, 13 units shut down
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या राज्यात 'सरप्लस' वीज उपलब्ध आहे. यातच काही दिवसांपासून थंडी वाढल्याने राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. परिणामी औष्णिक वीज केंद्रांपैकी ११ युनिट बंद ठेवण्यात आली आहेत, तर दोन युनिट इतर कारणांमुळे बंद आहेत. अशा प्रकारे राज्यातील एकूण १३ युनिट बंद आहेत. परळी येथील औष्णिक वीज केंद्र पूर्णपणे ठप्प झाले आहे. कमी उत्पादन खर्च असलेल्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य देत जास्त खर्चिक युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या 'महाजेनको' या वीज उत्पादन कंपनीकडे एकूण सात औष्णिक वीज केंद्रे आहेत. चंद्रपूर, कोराडी, खापरखेड़ा, परळी, पारस, भुसावळ आणि नाशिक या केंद्रांची एकत्रित उत्पादन क्षमता १०,८४२ मेगावॅट आहे. मात्र, मागणी घटल्याने केवळ ५,१८७ मेगावॉट उत्पादन घेतले जात आहे.
महावितरण क्षेत्रात बुधवारी विजेची मागणी २१,३८४ मेगावॉट इतकी नोंदली गेली, तर राज्यात उपलब्धता ३३,२८१ मेगावॉट आहे. या पार्श्वभूमीवर 'झिरो शेड्यूल' आणि 'आर.एस.डी. या योजनेंतर्गत अनेक युनिट बंद करण्यात आली आहेत. परळी औष्णिक वीज केंद्रातील सर्व तीन युनिट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. चंद्रपूर येथील पाच आणि भुसावळ येथील तीन युनिट बंद आहेत. कोराडी आणि नाशिक येथील प्रत्येकी एक युनिट इतर कारणांमुळे बंद ठेवण्यात आली आहे.
बंद केलेल्या सर्व युनिटची उत्पादन खर्च प्रतियुनिट ५ रुपयांहून अधिक आहे. परळी केंद्राचा उत्पादन खर्च अनुक्रमे ६.९२८ आणि ७.५१५ रुपये प्रतियुनिट इतका आहे. त्यामुळे ज्या युनिटचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यांना प्राधान्य दिले जात आहे.
खासगी क्षेत्रातून ५,२३२ मेगावॉट, केंद्र सरकारच्या एन.टी.पी.सी. कंपनीकडून ४,८६३ मेगावॉट आणि जलविद्युत प्रकल्पांमधून १,५०३ मेगावॉट वीज घेतली जात आहे.
खासगी क्षेत्राची क्षमता ५,७८५ मेगावॉट, उत्पादन ५,२३२ मेगावॉट
महागडी वीज असल्याने सरकारी वीज केंद्रे बंद ठेवली जात असताना, खासगी क्षेत्रातील केंद्रे मात्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत. राज्यातील खासगी औष्णिक वीज केंद्रांची एकूण उत्पादन क्षमता ५,७८५ मेगावॉट असून बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांच्याकडून ५,२३२ मेगावॉट वीज घेतली जात आहे. महावितरणच्या मते, या केंद्रांतील उत्पादन खर्च प्रतियुनिट ५ रुपयांपेक्षा कमी असल्याने त्यांच्याकडून वीज घेणे फायदेशीर ठरत आहे.
वीज मागणी का घटली?
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विजेची मागणी २,००० मेगावॉटने कमी झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेली थंडी. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे त्रस्त शेतकरी सिंचनासाठी विजेचा वापर कमी करत आहेत. दिवाळीनंतर औद्योगिक वीजवापरातही घट नोंदली गेली आहे.