Deepali Chavan Case: श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:50 IST2021-04-29T00:54:15+5:302021-04-29T06:50:16+5:30
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

Deepali Chavan Case: श्रीनिवास रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या; अमरावती पोलिसांची नागपुरात कारवाई
नागपूर : बहुचर्चित दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपूरात बुधवारी उशिरा रात्री ही कारवाई केली.
सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हे आरोपी असून सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील केली आहे. तर अमरावती ग्रामीण पोलिसांनी दीपाली चव्हाणच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली रेड्डी यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून रेड्डी अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. तर अमरावती पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत होते. बुधवारी दुपारपासून त्यांचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांची चमू नागपुरात दाखल झाली. त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली.
रात्री उशिरा शहरातील एका हॉटेल जवळ ते दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची नागपुरात जुजबी नोंद केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले. या संबंधाने अमरावती ग्रामीण पोलिसांच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पुनम पाटील यांच्याकडे लोकमतने विचारणा केली असता, त्यांनी रेड्डीना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण पोलिसांनी रेड्डी यांना ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी आधीच घेऊन ठेवली होती. अमरावतीत पोचल्यानंतर त्यांना रीतसर अटक केल्याचे दाखविले जाणार आहे. त्यानंतर पोलिस त्यांचा न्यायालयातून पीसीआर मिळवण्याच्या प्रयत्न करतील.
कुटुंबीयांना दिली माहिती
रेड्डी यांच्या अटकेच्या संबंधाने त्याच्या कुटुंबियांनाही पोलिसांनी माहिती दिल्याचे समजते.