टाटा एसच्या धडकेने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:33 IST2019-05-11T00:32:31+5:302019-05-11T00:33:09+5:30
मामाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला टाटा एसने धडक दिल्यामुळे करुण अंत झाला. मिथिलेश संजय टोपरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कळमन्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.

टाटा एसच्या धडकेने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मामाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला टाटा एसने धडक दिल्यामुळे करुण अंत झाला. मिथिलेश संजय टोपरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कळमन्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.
संजय मोतीराम टोपरे (वय ३४) हे कुंभारे भवन जवळ राहतात. उन्हाळ्याच्या सुटीमुळे ते पत्नी, मुलासह सासरी आले होते. संजय यांच्या मेव्हण्याची कळमन्यातील अण्णाभाऊ साठे भवनाजवळ टपरी आहे. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास चिमुकला मिथिलेश बाजूला खेळत होता. वेगात आलेल्या टाटा एस (एमएच ४९/ सी २५६६)च्या चालकाने मिथिलेशला धडक मारली. तो खाली पडला असता त्याच्या उजव्या पायावरून वाहन गेले. त्यामुळे मिथिलेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान मिथिलेशचा मृत्यू झाला. संजय टोपरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.