फाशीची शिक्षा तरी शिक्षण सोडले नाही; तीन कैद्यांना मिळाली एमएची पदवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:11 IST2026-04-08T18:10:41+5:302026-04-08T18:11:59+5:30
Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या चार भिंतींत बंद असतानाही तीन कैद्यांनी शिक्षणाची कास धरत इग्नूच्या माध्यमातून एम.ए.ची पदवी संपादन केली.

Death sentence did not stop education; Three prisoners get MA degree
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या चार भिंतींत बंद असतानाही तीन कैद्यांनी शिक्षणाची कास धरत इग्नूच्या माध्यमातून एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यापैकी दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, तर एकजण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मंगळवारी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा (इग्नू) दीक्षान्त समारंभपार पडला. विविध अभ्यासक्रमांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचाही समावेश होता.
गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरून मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही या तिघांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. सश्रम जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले रंजन रामनाथकर यांनी समाजशास्त्र विषयात एम.ए. पूर्ण केले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असगर युसुफ मुकादम याला अगोदर फाशी सुनावण्यात आली होती नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची मृत्युदंडाची शिक्षा आजन्म जन्मठेपेत रूपांतरित केली. त्यानेदेखील एमए पदवी प्राप्त केली. इंग्रजी साहित्य विषयात एम.ए. करणारा ऐतेशाम सिद्दिकी याने ज्यावेळी परीक्षा दिली तेव्हा तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद होता. त्याला २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. पदवीची परीक्षा दिल्यानंतर त्याची कारागृहातून सुटका झाली होती. कारागृह प्रशासनाने त्यांना अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते.