प्रिय मुख्यमंत्री... आम्ही शपथ घेतो की ...! फडणवीस शिकलेल्या शाळेत अनोखा वाढदिवस
By नरेश डोंगरे | Updated: July 23, 2025 12:19 IST2025-07-23T12:18:13+5:302025-07-23T12:19:10+5:30
Nagpur : 'देवाभाऊं'ना आदर्श गिफ्ट; विद्यार्थ्यांची 'नो ड्रग्ज'ची प्रतिज्ञा

Dear Chief Minister... We swear that...! Unique birthday at the school where Fadnavis studied
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हल्ली नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या आडून स्वत:चे मार्केटिंग करण्यावर बहुतांश मंडळी भर देतात. परमार्थातून स्वार्थ साधण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालण्याची त्यांची केविलवाणी धडपड मोठमोठ्या होर्डींग्ज'वरून दिसून येते. ज्या नेत्याचा वाढदिवस, त्या नेत्याचे महिमामंडन करतानाच स्वत:चाही उदोउदो अशा मंडळीकडून करवून घेतला जातो. मात्र, ज्यांचा राजकारणाशी कवडीचा संबंध नाही अन् ज्यांना मुख्यमंत्र्यांनी बघितलेही नाही, अशा सुमारे ६०० वर विद्यार्थी-विद्यार्थीनींनी एक आदर्श संकल्प करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा केला.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाची मिसाल ठरू पाहणारा हा प्रेरणादायी सोहळा शंकरनगरातील सरस्वती विद्यालयात मंगळवारी साजरा झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच शाळेत आपले सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, हे येथे उल्लेखनीय !
ब्रिटीश कालावधीत आकाराला आलेले हे 'विद्येचे मंदीर' सुमारे १३० वर्षे जुने आहे. प्रारंभी या शाळेला मद्रासी शाळा म्हणून ओळखले जायचे. आज घडीला शाळेत ३ हजारांच्या घरात मुले आणि मुली शिक्षणासोबतच संस्काराचे धडे गिरवितात. आपल्या याच विद्यामंदीरात शिकलेले 'देवा भाऊ' राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्याने अनेकांनी राज्यभरात होर्डिंग्ज लावले. काहींनी फळ वाटप, मिठाई वाटप आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. मात्र, आपण त्यांना वाढदिवसाचे एक आदर्श गिफ्ट देऊ असा संकल्प 'विद्या मंदीरा'ने आधीच केला होता. त्याला हातभार लावला नशाबंदी मंडळाने. त्यानुसार आज सकाळी सरस्वती विद्यालयात संस्थेच्या प्रमूख पुष्पा अनंत नारायण, एएचएम लक्ष्मी श्रीनिवासन, पर्यवेक्षक रवींद्र कुळकर्णी, राहुल घोडे यांनी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक गाैरव आळणे, ताराचंद पखिड्डे आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना शिक्षण, संस्कार अन् आदर्श यांची सांगड व्यक्तीला यशाच्या शिखरावर कशी पोहचवते, त्याबाबत छोटेखानी मार्गदर्शन केले. व्यसनामुळे समाज अधोगतीला जात आहे, तरुणाई उध्वस्त होत असून रक्ताचे नाते व्यसनामुळे विकृतीकडे वळत असल्याची उदाहरणे यावेळी विद्यार्थ्यांसमोर ठेवली. महाराष्ट्रासारख्या सुजलाम सुफलाम आणि पराक्रमी राज्याला ड्रग्ज फ्री करण्यासाठी मुख्यमंत्री कसोशिने प्रयत्न करीत आहेत. अशा देवाभाऊंच्या प्रयत्नांना आपणही बळ देण्याची गरज यावेळी सर्वांनी विशद केली. त्यानंतर देवाभाऊंना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून सर्वांनी 'नो डग्ज'ची प्रतिज्ञा केली.
'हॅप्पी बर्थडे टू सीएम'चा गजर
शाळेचे सनियर (शाळेचे माजी विद्यार्थी) मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस नंतर 'हॅप्पी बर्थडे टू सीएम'चा गजर करून साजरा करण्यात आला. आमच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर आणि आदर्श 'बर्थ डे' प्रोग्राम असल्याची प्रतिक्रिया यानुषंगाने संस्था प्रमूख पुष्पा अनंत नारायण यांनी लोकमतशी बोलताना दिली.