अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

By यदू जोशी | Updated: December 18, 2024 05:00 IST2024-12-18T04:59:48+5:302024-12-18T05:00:11+5:30

छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते.

dcm ajit pawar not reachable and despite being in the nagpur he did not visit vidhan bhavan stayed in the bungalow | अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मंत्रिमंडळात कमी वाटा मिळाला, वित्त खाते मिळण्याची खात्री नाही, म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याने ते 'नॉट रिचेबल' असल्याचे म्हटले जात असले, तरी त्या मागचे खरे कारण हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली तीव्र नाराजी हेच असल्याचे आता म्हटले जात आहे.

भुजबळ यांनी कालपासून अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. अजित पवार नागपुरातच आहेत, पण ते बंगल्याबाहेर आलेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीपासून 'इमेज बिल्डिंग'साठी त्यांनी एक एजन्सी नेमली आहे, त्या एजन्सीनेही नॉट रिचेबलचा' सल्ला दिल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना वगळण्यावर व त्यांच्या टीकेवर पवार लवकरच उत्तर देतील, असा दावा त्यांच्या पक्षाच्या नेत्याने 'लोकमत'शी बोलताना केला.

छगन भुजबळ यांनी केली पंचाईत 

माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यामुळे मंत्रिपदी मला कोणी डावलले याची मी माहिती घेत आहे, असे विधान छगन भुजबळ यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले. आपल्यासारख्या बहुजन नेत्याला फडणवीस यांचा विरोध नव्हता, असे भुजबळ यांनी सूचित केले आणि एकप्रकारे गच्छंतीसाठी अजित पवार यांना जबाबदार धरल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना मंत्री करावे, असे पक्षातील अन्य काही नेत्यांचे म्हणणे होते पण अंतिमतः त्यांना न घेण्याचा निर्णय झाला.

कधी कधी झाले नॉट रिचेबल? 

- २००९ मध्ये छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केले तेव्हा. 

- २०१२ मध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर. 

- २०१९ मध्ये शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर.... 

- २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली, पण काही तासांतच राजीनामा देऊन दोन दिवस अज्ञातवासात गेले.

त्यांना घशाचा संसर्ग!: 

माजी मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली. नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे.

 

Web Title: dcm ajit pawar not reachable and despite being in the nagpur he did not visit vidhan bhavan stayed in the bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.