विना रॉयल्टी सोबतच ओव्हरलोड ट्रकांची दिवसरात्र वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:34 PM2023-03-22T13:34:31+5:302023-03-22T13:35:20+5:30

वाळूच्या चोरट्या वाहतुकीतून कोण कोण होते मालामाल? 

Day and night transportation of overloaded trucks with no royalty | विना रॉयल्टी सोबतच ओव्हरलोड ट्रकांची दिवसरात्र वाहतूक

विना रॉयल्टी सोबतच ओव्हरलोड ट्रकांची दिवसरात्र वाहतूक

googlenewsNext

नागपूर :नागपूर, भंडारा जिल्ह्यातील रेतीघाट बंद असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. रेतीच्या या व्यवसायात रॉयल्टी ही केवळ नावाचीच राहिली असून, रेती घाटाच्या मालकापासून ते एसडीओ, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, आरटीओ, मोटार मालक अशी साखळी असून, विथ आऊट रॉयल्टी (डब्ल्यूआर) बिनधास्तपणे ओव्हरलोड रेतीचे ट्रक चंद्रपुरातून नागपुरात येत आहे. वाळूच्या चोरट्या वाहतुकीतून संपूर्ण यंत्रणाच मालामाल होत आहे.

- सर्वजण झोपले की यांना येते जाग

‘ लोकमत ’ च्या पथकाने ब्रम्हपुरीतून काम्पा मार्गाने नागपुरात येणाऱ्या रेतीच्या ट्रकांचा पाठलाग केला. या रस्त्यावर ओव्हरलोड रेतीचे ट्रक बऱ्याच ठिकाणी थांबलेले दिसून आले. हे सर्व ट्रक डब्ल्यूआर असल्याचे सांगण्यात आले. कारण रॉयल्टी असलेल्या ट्रकला ओव्हरलोड वाहतूक करताच येत नाही ; पण रॉयल्टी नसेल आणि रेती ओव्हरलोड असेल तर लाखो रुपयांचे चलन होते. हे चलन सरकारच्या तिजोरीत जाते. अधिकाऱ्यांना काहीच मिळत नसल्याने मोटार मालकांसाठी सुपर एन्ट्री देन बिनधास्तपणे डोळे मिटून रेती वाहतूक केली जाते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र एन्ट्री मोटारचालक देतात. एखाद्या विभागाला एन्ट्री न मिळाल्यास कारवाई होऊ शकते या भीतीपोटी सर्वजण झोपले की मध्यरात्री व पहाटे पहाटे रेतीची वाहतूक होते.

- वाहतुकीसाठी नंबर नसलेले वाहन

‘ लोकमत ’ च्या पथकाने चंद्रपुरातून नागपुरात रेतीची वाहतूक करणाऱ्या काही ट्रक कॅमेऱ्यात टिपले. काही ट्रकच्या मागच्या भागात नंबरप्लेट दिसली नाही. काही ट्रकवरील मागची नंबरप्लेट काढून टाकली होती. काहींनी पुसटशी नंबरप्लेट लावलेली दिसली. काही ट्रॅकची नंबरप्लेट दिसणार नाही, अशा प्रकारे लपवून ठेवलेली दिसली. ट्रकच्या मागच्या भागाला नंबरप्लेट कुठे असावी, असा मोटर व्हेईकल कायद्यात नियम असतानाही नंबरप्लेट लावली जात नाही.

- लिलाव नाही, मग वाळू कोठून येते ?

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव झालेले नाही. ब्रम्हपुरीतील ७ घाटांचे लिलाव झाले आहे. येथून रेतीची डब्ल्यूआर ओव्हरलोड रेतीची वाहतूक होते. रेतीमध्ये सर्वच मालामाल होत असल्याने ग्राहकांना महागडी वाळू मिळते.

- ५५१५ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई

नागपूर शहर आरटीओतील वायूवेग पथकाकडून एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ कालावधीत ११७४ व ग्रामीण आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून ४३४२ असे एकूण ५५१५ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली. यातून ४ कोटी ८२ लाखांचा महसूल प्राप्त झाला.

- अधिकाऱ्यांचे तोंड बांधलेले

रेतीच्या ओव्हरलोड व डब्ल्यूआर ट्रकांवर कारवाईचे अधिकार एसडीओ, तहसीलदार, ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, आरटीओ, ग्रामीण वाहतूक पोलिस, एलसीबी यांना असते. ब्रम्हपुरी ते नागपूर दरम्यान अनेक पोलिस ठाणे लागतात ज्यातून ही वाहतूक होते. पण पोलिस अधिकारी म्हणतात आमच्याच ठाण्याच्या हद्दीतून जात नाही. सुरुवातीपासूनच चेक लावला तर आमच्या हद्दीतून वाहतूक होणार नाही. पोलिसांप्रमाणे तहसीलदार ही या प्रकरणात बोलायला तयार नाही.

Web Title: Day and night transportation of overloaded trucks with no royalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.