दपूम रेल्वेने १२०६ कोचमध्ये लावले ४२९९ बायो टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:56 IST2019-11-11T21:54:40+5:302019-11-11T21:56:16+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने १२०६ कोचमध्ये ४२९९ बायो टॉयलेट लावून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दपूम रेल्वेने १२०६ कोचमध्ये लावले ४२९९ बायो टॉयलेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छता अभियानांतर्गत रेल्वेगाड्या आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असताना भारतीय रेल्वेने बायो टॉयलेट विकसित केले. हे बायो टॉयलेट पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकुल असून यात मानवी मल ६ ते ८ तासात गॅस आणि पाण्यात रुपांतरीत होतो. यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने १२०६ कोचमध्ये ४२९९ बायो टॉयलेट लावून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
बायो टॉयलेटमध्ये मानवी मल थेट टँकमध्ये जाऊन त्याचे पाणी आणि गॅसमध्ये रुपांतर होते. यामुळे रेल्वेस्थानक आणि रेल्वे रुळाच्या आजूबाजूला स्वच्छता राखण्यास मदत होते. बायो टॉयलेटमुळे रेल्वे रुळांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ३० सप्टेबर २०१९ पर्यंत सर्व कोचमध्ये बायो टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व जुन्या १२०६ कोचमध्ये यशस्वीरीत्या ४२९९ बायो टॉयलेट लावण्यात आले आहेत. बायो टॉयलेट टँक स्टीलची बनविलेली असते. त्याची लांबी ११५० मिलिमिटर, रुंदी ७२० मिलीमिटर आणि उंची ५४० मिलीमिटर असते. या टँकचे वजन १६८ किलोग्रॅमआणि भरलेल्या स्थितीत ४२५ किलोग्रॅम असते. एक टँक तयार करण्यासाठी ७५ हजार रुपये खर्च येतो. बायो टॉयलेटमध्ये प्रवाशांनी कचरा, चहाचे कप, पाण्याच्या बॉटल, गुटख्याची पाकिटे, प्लास्टिक टाकल्यास ते नादुरुस्त होते. त्यामुळे प्रवाशांनी बाय टॉयलेटमध्ये कुठल्याही वस्तू न टाकून पर्यावरण रक्षणाच्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.