कागदोपत्री कारवाईत अडले कासव!

By Admin | Updated: June 14, 2015 03:06 IST2015-06-14T03:06:02+5:302015-06-14T03:06:02+5:30

मागील १२ दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांनी तस्करांकडून पकडलेले कासव केवळ कागदपत्रांच्या कारवाईत अडकून पडले आहेत.

Dagduti's action is stuck! | कागदोपत्री कारवाईत अडले कासव!

कागदोपत्री कारवाईत अडले कासव!

१६ कासवांचा मृत्यू : पीसीसीएफच्या परवानगीची प्रतीक्षा
नागपूर : मागील १२ दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांनी तस्करांकडून पकडलेले कासव केवळ कागदपत्रांच्या कारवाईत अडकून पडले आहेत. नागपूर वन विभागाने ते सर्व कासव लखनौ येथे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी उत्तर प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची परवानगी लागत असून, त्यासाठी मागील आठ दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे.
दुसरीकडे मागील १२ दिवसांत १६ कासवांचा मृत्यू झाला असून, आता ८० कासव शिल्लक राहिले आहेत. नागपूर वन विभागाने उर्वरित सर्व कासम सेमिनरी हिल्स येथील मृगविहारातील पाण्याच्या टाक्यात ठेवले आहेत.
यासंबंधी नागपूरचे उपवनसंरक्षक के. आर. प्रवीण यांना विचारणा केली असता, त्यांनी वन विभागाने कासवांना लखनौ येथे पाठविण्याची सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले. परंतु त्यासाठी उत्तर प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी लागत असून, त्यासाठी प्रतीक्षा केली जात आहे. कासवांच्या मृत्यूविषयी बोलताना ते म्हणाले, तस्करांनी या कासवांना डब्यात पॅकबंद केल्यामुळे काही कासवांचा गुद्मरून मृत्यू झाला आहे. परंतु आता उर्वरित कासव सुरक्षित असल्याचे ते म्हणाले.
मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या मते, कासवांना लखनौ येथे पाठविण्यासाठी तेथील एका स्वयंसेवी संस्थेसह उत्तर प्रदेशच्या पीसीसीएफ कार्यालयाशी सतत संपर्क साधला जात आहे. शिवाय मागील ४ जून रोजी एक लेखी पत्रही पाठविण्यात आले आहे. परंतु अजूनपर्यंत त्या पत्राचे उत्तर आलेले नाही.
विशेष म्हणजे, या कासवांना लखनौ येथे पाठविण्यासाठी महाराष्ट्राचे पीसीसीएफ व न्यायालयाने यापूर्वीच परवानगी दिली असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Dagduti's action is stuck!