नरेश डोंगरे, नागपूर गुन्हेगारच नव्हे तर बेशिस्त पोलिस अधिकाऱ्यांनाही ज्यांच्यामुळे धडकी भरायची, असे पोलिस महासंचालक (निवृत्त) आणि नागपूरचे माजी पोलिस आयुक्त शारदा प्रसाद (एसपी) यादव यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शनिवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. यादव हे मुळचे उत्तरप्रदेशातील राहणारे आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यादव २०१७-१८ मध्ये नागपुरात आयुक्त म्हणून कार्यरत होते. नागपुरात आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर ‘ये शहर मेरा घर है, यहां पर किसी की गुंडागर्दी नहीं चलने दूंगा’ असे म्हणत यादव यांनी बेमिसाल पुलिसिंग केली होती.
अत्यंत करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून पोलिस दलात ओळखल्या जाणाऱ्या यादव यांना संवेदनशील मनाचे व्यक्ती म्हणूनही पोलीस यंत्रणा ओळखत होती. नागपुरात कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड केला होता.
गुन्हेगारांशी मैत्री ठेवणाऱ्या पोलिसांना ते नेहमीसाठी लक्षात राहील, असा धडा शिकवत होते. आपण अधिकारी आहोत आणि कसेही वागलो तरी काही बिघडणार नाही, असा तोरा असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जरीपटक्यातील घटनास्थळी येथील एका महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केले होते.
पत्रकारांनी ही बाब यादव यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. त्या अधिकाऱ्याला तातडीने चेंबरमध्ये बोलवून त्याची खरडपट्टी काढली तसेच तत्कालीन सहआयुक्त राजवर्धन यांना 'त्या' अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. यावेळी स्वत:ला सिंघम म्हणवून घेणारा तो अधिकारी अक्षरश: केविलवाणा झाल्याचे अनेकांनी बघितले होते.
पोलिस अधिकारी आहे, म्हणून त्याने कसेही वागावे हे चालणार नाही, असा इशारा त्यांनी या कारवाईतून दिला होता. हे करतानाच पोलिस असो अथवा सामान्य नागरिक, त्याला काही त्रास होत असेल आणि यादव यांना जर ते कळले तर ते स्वत:च त्या प्रकरणात लक्ष घालून न्यायनिवाडा करीत होते.
गुन्हेगारी नियंत्रणासाठी ते नेहमी पत्रकारांची मदत घेत होते आणि नागपुरातून पदोन्नतीवर मुंबईत बदली झाल्यानंतरही ते स्थानिक पत्रकारांसह अनेकांच्या संपर्कात होते. त्यांच्या निधनाचे वृत्त शहरातील पोलिसांसह अनेकांसाठी दु:खद ठरले आहे.