नागपूर विभागातील २७ सिंचन टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे : 'एसीबी'ची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 23:20 IST2019-12-06T23:19:29+5:302019-12-06T23:20:21+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांच्या २७ टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

नागपूर विभागातील २७ सिंचन टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे : 'एसीबी'ची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांच्या २७ टेंडरमध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्रात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
नागपूर विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यातील अन्य माहितीनुसार, नागपूर विभागाचे विशेष तपास पथक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या १७ सिंचन प्रकल्पांतील ३०२ टेंडर्सची चौकशी करीत आहे. आतापर्यंत पथकाने २० प्रकरणात एफआयआर नोंदविले आहेत. ५ प्रकरणात संबंधित न्यायालयामध्ये दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. सरकारकडून ११ प्रकरणात अधिकाऱ्यांविरुद्ध खटला चालविण्याला सशर्त मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली नाहीत. चौकशीत काहीच दखलपात्र आढळून आले नसल्यामुळे ३३ प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली आहे. तसेच, यासारख्या अन्य ४० प्रकरणाची फाईल बंद करण्याच्या अहवालाची पडताळणी केली जात आहे. ७ प्रकरणात चौकशी पूर्ण झाली असून तपास सुरू करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना परवानगी मागण्यात आली आहे तर, २०२ प्रकरणांमधील चौकशी प्रगतिपथावर आहे.