Crime : Large racket active in Remedicivir black market, accused remanded in judicial custody for 5 days | Crime : रेमडिसीवीरच्या काळ्याबाजारात मोठे रॅकेट, आरोपींना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Crime : रेमडिसीवीरच्या काळ्याबाजारात मोठे रॅकेट, आरोपींना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठळक मुद्देनागपूरच नव्हे तर राज्यात कोरोनाचा अक्षरशा उद्रेक झाला असून रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता बाळगणाऱ्या काही उलट्या काळजाच्या मंडळींनी रेमडिसीविरचे ब्लॅकमार्केटींग चालवले आहे.

नागपूर : रेमडेसिविरची काळाबाजारी करणाऱ्यांमध्ये एक मोठे रॅकेटच सक्रीय असल्याचा संशय असून त्यात आणखी काही डॉक्टर आणि विविध हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका डॉक्टरसह वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. दुसरीकडे काळाबाजारी करताना रंगेहात पकडण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवला आहे. 

नागपूरच नव्हे तर राज्यात कोरोनाचा अक्षरशा उद्रेक झाला असून रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची मानसिकता बाळगणाऱ्या काही उलट्या काळजाच्या मंडळींनी रेमडिसीविरचे ब्लॅकमार्केटींग चालवले आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालयात लावण्यासाठी आणलेल्या इंजेक्शनची १५ ते २५ हजारात विक्री करण्याचा प्रचंड संतापजनक प्रकार या भामट्यांनी सुरू केला आहे. हे इंजेक्शन विकत घेण्यासाठी  कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक जीवाचा आटापिटा करीत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेऊन रेमडिसीविरची ब्लॅकमार्केटींग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी सापळा रचला. त्यांनी डमी ग्राहक बनवून आरोपींशी संपर्क साधला आणि गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून रेमडिसीविर विकणारा डॉ. लोकेश शाहू आशा (आशा हॉस्पिटल, कामठी), वार्डबॉय शुभम मोहदुरे आणि कुणाल कोहळे (स्वस्थम हॉस्पिटल, वर्धा रोड) आणि सुमीत बागडे (दत्ता मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी) या चौघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १५ इंजेक्शन जप्त केले. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्यांचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवला. 

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपायुक्त निलोत्पल यांनी स्वताच चौकशीची सुत्रे हातात घेतली आहे. अटकेतील आरोपींकडून शुक्रवारी मोठी रक्कम जप्त केली. त्याबाबतचा खुलासा तुर्त करणे योग्य नसल्याचे उपायुक्त निलोत्पल म्हणाले. आरोपीनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका डॉक्टरसह कामठी आणि नागपुरातील आणखी चार हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रेमडिसिविरच्या काळाबाजारीत या हॉस्पिटलचीही भूमीका काय आहे, त्याचीही आम्ही चौकशी करित असल्याचे त्यांनी सांगितले. काळाबाजारी करणाऱ्या या रॅकेटचे धागेदोरे बाहेर जिल्ह्याशीही जुळले असल्याचा संशय असल्यामुळे पुढच्या काही तासांत धक्कादायक घडामोडींचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत. 

ते इंजेक्शन मृत रुग्णांचे ?
हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू व्हायचा, त्याच्या जवळचे इंजेक्शन लंपास करून आम्ही ते विकत होतो, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या माहितीची पोलिसांकडून शहानिशा केली जात आहे. 
 

Web Title: Crime : Large racket active in Remedicivir black market, accused remanded in judicial custody for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.