गुराख्याची जनावरे आणि कुत्र्यांनी केले त्याच्या मृतदेहाचे राखण; अल्पवयीन मुलाने रागात केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:14 IST2025-11-12T18:13:08+5:302025-11-12T18:14:14+5:30
गुरांनी पिकाचे नुकसान केल्याने संताप : लोणारा शिवारातील घटना

Cowherd's animals and dogs guarded his body; minor boy kills him in anger
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : गुरे वारंवार शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने चिडलेल्या १६ वर्षीय मुलाने वृद्ध गुराख्यास काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणारा शिवारात सोमवारी (दि. १०) सायंकाळी घडली.
मोहन लहानू शेरकी (वय ७६, रा. लोणारा, ता. भिवापूर) असे मृत गुराख्याचे नाव आहे. अल्पवयीन मुलगादेखील लोणारा येथील रहिवासी असून, त्याची याच गावाच्या शिवारात जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेती आहे. मोहन रोज त्याची गुरे घेऊन याच रस्त्याने जंगलात जायचा आणि घरी परत यायचा. त्याची गुरे अधूनमधून त्या मुलाच्या शेतात शिरायची आणि ते पीक खात असल्याने त्याचे नुकसान व्हायचे. मोहन सोमवारी सायंकाळी जंगलातून गुरे घेऊन घराकडे निघाला होता. त्यातच काही जनावरे मुलाच्या शेतात शिरली होती. त्याचवेळी मुलगादेखील शेतात होता.
गुरांना पाहताच मुलाला राग आला आणि त्याने काठीने मोहनला मारहाण करायला सुरुवात केली. डोक्यावर काठीने वार केल्याने मोहन गंभीर जखमी झाल्याने खाली कोसळला आणि काही वेळात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहन घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. तो शेतात जखमी व मृतावस्थेत पडून असल्याचे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी संशयाच्या बळावर अल्पवयीन मुलास ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) ३०१ (१) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शेळ्यांमुळे फुटले वादाला तोंड
मोहन सोमवारी दुपारी त्या मुलाच्या शेताजवळ गुरे चारत उभा होता. त्यातच त्याच्या शेळ्या तारांच्या कुंपणातून मुलाच्या शेतात गेल्या आणि पन्हाट्या खाऊ लागल्या. त्याचवेळी त्या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली होती. मात्र, हा वाद काही वेळाने मिटला आणि दोघेही निघून गेले. त्यानंतर सायंकाळी मोहनच्या बकऱ्या पुन्हा शेतात शिरल्या आणि पुन्हा वादाला तोंड फुटले. त्यात मोहनला जीव गमवावा लागला.
गुरांसह कुत्री मृतदेहाभोवती
कुटुंबीयांसह नागरिकांनी जेव्हा मोहनचा शोध सुरू केला, तेव्हा तो शेतात जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्याच्या अवतीभवती त्याची जनावरे आणि काही कुत्री होती. ती कुत्रीदेखील पाळीव असल्याचे नागरिकांनी सांगितले.