कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार
By सुनील चरपे | Updated: August 9, 2024 13:08 IST2024-08-09T13:07:59+5:302024-08-09T13:08:38+5:30
१६.३६ लाख हेक्टरची घट : तेलबियांसह डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ

कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार
सुनील चरपे -
नागपूर : मागील खरीप हंगामाच्या तुलनेत चालू खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल १६.३६३ लाख हेक्टरने घटले आहे. तुलनेत साेयाबीनसह इतर तेलबिया, डाळवर्गीय पिके आणि भरडधान्याच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. देशात कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून दर मात्र दबावात राहणार आहेत.
२ ऑगस्टपर्यंत देशभरात ९०४.६० लाख हेक्टरवर विविध खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी डाळवर्गीय पिकांचे पेरणीक्षेत्र १०.९० लाख हेक्टर, भरडधान्याचे ५.२१ लाख हेक्टर, साेयाबीनचे ३.२६ लाख हेक्टर, तेलबियांचे ५.९० लाख हेक्टर, तर धानाचे क्षेत्र १३.९० लाख हेक्टरने वाढले आहे. मागील वर्षी १२५.२०० लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झा ली हाेती. यंदा ६ ऑगस्टपर्यंत १०८.८३७ लाख हेक्टर क्षेत्र आहे.
कापूस पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर) (६ ऑगस्टपर्यंत)
nदेशातील १० प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र चार हजार ते ३.३० लाख हेक्टरने घटले आहे.
कुठे फायदा, तर कुठे फटका
अतिपाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भातील कापसाची अवस्था सध्यातरी वाईट आहे. खान्देश, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेश व गुजरातमध्ये पिकांची अवस्था चांगली असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भावामुळे पंजाब, हरयाण व राजस्थान या तीन राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र सरासरी ३० टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नुकसान पातळी ७५ टक्के कमी आहे. तिन्ही राज्यांमध्ये पिके चांगली असल्याने या राज्यांमधील कापूस सप्टेंबरमध्ये येईल.
- नवनीतसिंह सैनी,
संस्थापक, इंडियन काॅटन इनसाइट्स, हरयाणा.