धंतोलीतील रस्ता रात्रभरात दुरुस्त
By Admin | Updated: May 6, 2017 02:47 IST2017-05-06T02:47:34+5:302017-05-06T02:47:34+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मनपा अधिकाऱ्यांना कारागृहात पाठविण्याची तंबी दिल्यानंतर

धंतोलीतील रस्ता रात्रभरात दुरुस्त
हायकोर्टाचा दणका : अधिकाऱ्यांनी लगेच केली धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मनपा अधिकाऱ्यांना कारागृहात पाठविण्याची तंबी दिल्यानंतर धंतोलीतील एक रस्ता रात्रभरात दुरुस्त करण्यात आला.
स्पंदन रुग्णालयाच्या बाजूला नवीन रुग्णालय बांधले जात आहे. या ठिकाणी बांधकाम साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांमुळे सार्वजनिक रस्ता उखडला होता. तसेच, बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच ठेवले जात होते. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. २७ एप्रिल रोजी न्यायालयाने यावरून मनपाला फटकारले होते. त्यानंतरही रस्ता दुरुस्त करण्यात आला नव्हता. परिणामी, न्यायालयाने ४ मे रोजी संबंधित रस्ता सकाळी १०.३० वाजतापर्यंत दुरुस्त करण्याचा मौखिक आदेश दिला होता. तसेच, आदेशावर अंमलबजावणी न झाल्यास अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवू अशी तंबी दिली होती. त्यानंतर मनपाने तातडीने पावले उचलून रात्रभरात रस्ता दुरुस्त केला.
आज, शुक्रवारी हे प्रकरण न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता मनपाने रस्ता दुरुस्त केल्याची माहिती दिली. रस्ता खराब झाल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित करणाऱ्या धंतोली नागरिक मंडळाने कामाच्या दर्जावर आक्षेप घेतला. रस्त्याचे काम गुणवत्ताहीन असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर उत्तर सादर करताना मनपाने गुणवत्ता सुधारण्याची ग्वाही दिली. परिणामी न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी तहकूब करून उन्हाळ्याच्या सुट्यानंतरची तारीख दिली.