विदर्भातील कोळशाचे रूपांतर 'वायू'त, 'सिंथेटिक नॅचरल गॅस'कडे महाझेप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:53 IST2026-03-06T12:52:47+5:302026-03-06T12:53:22+5:30

Nagpur : विदर्भाच्या मातीत दडलेले 'काळे सोने' आता नव्या ऊर्जा क्रांतीचे रूप धारण करीत आहे. अत्याधुनिक 'कोल गॅसिफिकेशन' तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कोळसा ज्वलनापलीकडे जाऊन स्वच्छ, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक इंधननिर्मितीचा नवा अध्याय येथे सुरू झाला आहे.

Conversion of coal in Vidarbha into 'gas', a major leap towards 'synthetic natural gas'! | विदर्भातील कोळशाचे रूपांतर 'वायू'त, 'सिंथेटिक नॅचरल गॅस'कडे महाझेप !

Conversion of coal in Vidarbha into 'gas', a major leap towards 'synthetic natural gas'!

बालाजी देवर्जनकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विदर्भाच्या मातीत दडलेले 'काळे सोने' आता नव्या ऊर्जा क्रांतीचे रूप धारण करीत आहे. अत्याधुनिक 'कोल गॅसिफिकेशन' तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कोळसा ज्वलनापलीकडे जाऊन स्वच्छ, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक इंधननिर्मितीचा नवा अध्याय येथे सुरू झाला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या पुढाकारातून उभारले जाणारे पाच महाप्रकल्प आणि त्यातून होणारे वार्षिक १७.०४ दशलक्ष टन 'सिंथेटिक नॅचरल गॅस' उत्पादन विदर्भाच्या औद्योगिक क्षितिजाला नवी झेप देणार आहे. ऊर्जा-सुरक्षेच्या राष्ट्रीय समीकरणात विदर्भ भविष्यात केवळ खनिजांचा प्रदेश राहणार नाही, तर भारताच्या 'नेट झीरो' ध्येयाचा भक्कम ऊर्जा-कणा म्हणून उदयास येणार आहे.

या संपूर्ण उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प, माजरी क्षेत्रातील जुन्या कुनाडा खाणीत कोल इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियमच्या संयुक्त प्रयत्नांतून आधुनिक प्रकल्प साकारले जात आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत या संयुक्त कंपनीची स्थापना होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रक्रियेत कोळशाचे थेट ज्वलन न करता त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे वायूमध्ये रूपांतर केले जाईल. या प्रक्रियेतून तयार होणारा 'सिंथेटिक नॅचरल गॅस' (एसएनजी) हा नैसर्गिक वायूला (पीएनजी) एक सक्षम आणि किफायतशीर पर्याय ठरेल. या उपक्रमासाठी टाकळी जेना, निलगाव, एकात्मिक उकनी-पिंपळगाव विस्तार, सावनेर-३ आणि निलजई विस्तार या पाच प्रमुख प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

सौरऊर्जेचा पूरक आराखडा

  • गॅसिफिकेशन प्रकल्पांना पूरक म्हणून 'डब्ल्यूसीएल'ने नूतनीकरणक्षम ऊर्जेचा मोठा आराखडा तयार केला आहे. विशेषतः सौरऊर्जेवर भर देत विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे.
  • जामुनिया भूमिगत खाणीतील १५ मेगावॅटचा सौर प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, तसेच कन्हानमधील नंदन वॉशरी येथे ७० मेगावॅट, चंद्रपूरमधील दुर्गापूर येथे ५ मेगावॅट आणि माजरी क्षेत्रात २३ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले जात आहेत.
  • या सौर प्रकल्पांमुळे कंपनीची पारंपरिक विजेवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भविष्यात कंपनी ऊर्जानिर्मितीत आत्मनिर्भर होण्याचा मार्ग यामुळे मोकळा होईल.

 

गॅसिफिकेशन ते सौरऊर्जा : विदर्भाच्या विकासाचा नवा मार्ग

  • कोळशाच्या गॅसिफिकेशन प्रक्रियेतून तयार होणारे स्वच्छ व कार्यक्षम इंधन.
  • उष्मांक क्षमता नैसर्गिक वायुसमान, त्यामुळे औद्योगिक वापरासाठी उपयुक्त.
  • पारंपरिक कोळसा ज्वलनाच्या तुलनेत कार्बन व सल्फर उत्सर्जन कमी.
  • आयातीत नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व घट, स्वदेशी पर्याय उपलब्ध.
  • ऊर्जा आयातीवरील खर्च कमी, परकीय चलनाची बचत.
  • पाइपलाइनद्वारे पुरवठ्यामुळे वाहतूक खर्चात सुमारे ८० टक्के घट.
  • सौरऊर्जेमुळे विदर्भात स्वच्छ व स्थिर ऊर्जा उपलब्धता वाढ.
  • उत्पादित सौरऊर्जा ग्रीडमध्ये समाविष्ट केल्यास कृषी व लघुउद्योगांना दिवसा स्थिर वीजपुरवठा.
  • कोळसा खाणींच्या ओसाड जमिनींचा सौर पार्कसाठी उपयोग.

 

हे प्रकल्प औद्योगिक वाढ आणि शाश्वत विकासाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भविष्यात हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा उत्पादनाशी स्पर्धा करणारा ठरू शकतो. एवढ्या प्रमाणातील गॅसचा वापर वीजनिर्मिती, खत उद्योग, रसायन उद्योग आणि औद्योगिक इंधन म्हणून होऊ शकतो. त्यामुळे कोळशावर आधारित पारंपरिक वीजनिर्मितीवरचा ताणही कमी होण्याची शक्यता आहे.
 

Web Title : विदर्भ में कोयले का रूपांतरण: सिंथेटिक प्राकृतिक गैस उत्पादन की ओर बड़ी छलांग

Web Summary : विदर्भ उन्नत तकनीक के माध्यम से कोयले को सिंथेटिक प्राकृतिक गैस में बदल रहा है। पांच परियोजनाएं सालाना 17.04 मिलियन टन उत्पादन करेंगी, जिससे उद्योग और ऊर्जा सुरक्षा को बढ़ावा मिलेगा। सौर ऊर्जा का एकीकरण स्थिरता को और बढ़ावा देता है और पारंपरिक बिजली स्रोतों पर निर्भरता को कम करता है, जिससे हरित भविष्य का मार्ग प्रशस्त होता है।

Web Title : Vidarbha Coal Transformation: Leaping to Synthetic Natural Gas Production

Web Summary : Vidarbha transforms coal into synthetic natural gas via advanced technology. Five projects will produce 17.04 million tons annually, boosting industry and energy security. Solar energy integration further promotes sustainability and reduces reliance on traditional power sources, paving the way for a greener future.