देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी टोळी किंवा खासगी कंपनीला कंत्राट; तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:28 IST2020-05-05T13:27:55+5:302020-05-05T13:28:24+5:30
देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत असल्याच्या मुद्द्यामुळे राजकारण तापायला लागले आहे. नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी टोळी किंवा खासगी कंपनीला कंत्राट; तक्रार दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत असल्याच्या मुद्द्यामुळे राजकारण तापायला लागले आहे. नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. जाणुनबुजून फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत असून यासाठी एखादी टोळी किंवा कंपनीलाच कंत्राट देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुंबईतदेखील अशा आशयाची तक्रार झाली होती.
फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे शासनाच्या त्रुटी समोर आणणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. शिवाय राज्यपालांची भेट घेण्याचादेखील त्यांना अधिकार आहे. मात्र त्यांनी कुठलेही वक्तव्य केले, भूमिका मांडली किंवा राज्यपालांची भेट घेतली की त्यांच्यावर सोशल मिडीयात वाईट पद्धतीने ट्रोलिंग करण्यात येते.
देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या देण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत अयोग्य भाषेचा वापर होत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तापक्षातील लोक अयोग्य पद्धतीने सोशल मिडीयाचा वापर करत आहेत. यामुळेच नागपुरचे आमदार, महापौर, शहराध्यक्षांनी मिळून पोलीस आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. असे प्रकार करणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.अनिल सोले यांनी केली.
भाजपच्या शिष्टमंडळात आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, आ.गिरीश व्यास,महापौर संदीप जोशी, शहराध्यक्ष प्रवीण दटके हे प्रामुख्याने उपस्थित होते.