राष्ट्रवादीशी आघाडी केली तरच बसणार काँग्रेसची सत्तेची घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:18 PM2022-05-21T13:18:47+5:302022-05-21T13:23:54+5:30

दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तर गेल्या निवडणुकीचे चित्र पुन्हा दिसेल. राष्ट्रवादी किती जागा जिंकेल, यापेक्षा काँग्रेसची सत्तेची घडी बसविणे कठीण जाईल, अशी शक्यता या नेत्यांनी वर्तविली आहे.

congress ncp political drama in nagpur amid upcoming local body elections | राष्ट्रवादीशी आघाडी केली तरच बसणार काँग्रेसची सत्तेची घडी

राष्ट्रवादीशी आघाडी केली तरच बसणार काँग्रेसची सत्तेची घडी

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना हवी आघाडी

कमलेश वानखेडे

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचे टाळले असले तरी नागपुरातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना त्यांचा हा निर्णय पटलेला नाही. आघाडी न केल्यास राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होतील. ते धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करतील. याचा थेट फटका निश्चितच काँग्रेसला बसेल, असा दावा या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुकीला सामोरे जावे, अशी अपेक्षाही या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड आदी जुन्या नेत्यांना नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी हवी आहे. मात्र, आपण आपले म्हणणे सार्वत्रिकरित्या न मांडता पक्षाच्या मंचावर मांडू, अशी या नेत्यांची भूमिका आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी एक आहे. दोन्ही पक्षांना मानणारा मतदार आहे. अशात दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तर गेल्या निवडणुकीचे चित्र पुन्हा दिसेल. राष्ट्रवादी किती जागा जिंकेल, यापेक्षा काँग्रेसची सत्तेची घडी बसविणे कठीण जाईल, अशी शक्यता या नेत्यांनी वर्तविली आहे.

...तर काँग्रेसच्या किमान दहा जागा वाढल्या असत्या

-महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर सर्व १५१ जागा लढली. फक्त २९ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीचेही नुकसान झाले. फक्त एक जागा जिंकली. मात्र, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी असती तर राष्ट्रवादीच्या दोन - चार जागा व काँग्रेसच्या किमान दहा जागा वाढल्या असत्या, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीची चर्चा व्हावी

- काँग्रेस सक्षम असल्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्धार करणे चुकीचे नाही. पण, व्होट बँकेचे विभाजन टाळण्यासाठी, एकोप्याने प्रचारात मुसंडी मारण्यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वबळाची ताठर भूमिका न घेता राष्ट्रवादीशी स्थानिक पातळीवर चर्चा करणे आवश्यक आहे. आता नगरसेवकांची संख्या १५१वरून १५६ झाली आहे. पाच जागा तशाही वाढल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीशी चर्चा करून कमी - अधिक जागा करून मार्ग काढणे आवश्यक आहे, असे माजी आ. अशोक धवड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

नेत्यांसाठी आघाडी, तर कार्यकर्त्यांसाठी का नाही ?

- लोकसभा व विधानसभा ही नेत्यांची निवडणूक असते. या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी होते. तिचा फायदा निवडणूक लढणाऱ्या नेत्यांना होतो. महापालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी, त्याच्या मार्गातील अडथळे दूर होण्यासाठी व त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडण्यासाठी आघाडी करावी लागत असेल तर त्यात वाईट काय आहे, असा कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.

पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडू

आघाडी व्हावी की नाही यावर काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाची उघड भूमिका घेतली आहे. जयपूरच्या शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांची युती न करण्याबाबतची भूमिका मांडली आहे. पण नागपूर पदवीधर मतदारसंघात आ. अभिजंत वंजारी यांच्यासाठी सर्व एकत्र आल्याने काय चमत्कार झाला, हे देखील आपण पाहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी बाबतची चर्चा जेव्हा केव्हा पक्ष पातळीवर होईल, तेव्हा तेथे आपण आपली भूमिका मांडू. मी काँग्रेसचा शिपाई आहे, त्यामुळे सार्वजिनकरित्या भाष्य करणार नाही.

- सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री

Web Title: congress ncp political drama in nagpur amid upcoming local body elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.