काँग्रेसकडे मुद्देच नाहीत ! फक्त फोटो सेशनसाठी आंदोलन अन् ईव्हीएमचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:42 IST2025-01-27T11:40:33+5:302025-01-27T11:42:29+5:30
Nagpur : बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका

Congress has no issues! Only agitating for a photo session and opposing EVMs
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे ते ईव्हीएमबाबत 'फेक नॅरेटिव्ह' तयार करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि भाजपला झटका बसला. यासाठी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. काँग्रेसने आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कशी तयारी केली हे भाजपने वारंवार उघड केले आहे. संध्याकाळी मतदान कसे वाढले याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना दिली होती. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ईव्हीएम 'सेट' करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले आहे. पण एकाही पक्षाने हे आव्हान स्वीकारले नाही. आता काँग्रेस आंदोलन करून प्रसिद्धीचा स्टंट करत आहे. काँग्रेसतर्फे केली जाणारी आंदोलने फक्त फोटोसेशन पुरती मर्यादित राहिली आहेत, अशी टीका त्यांनी केली.
न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुका
ओबीसी आरक्षणाकरिताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्या दिवशी निवडणुका होतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कोराडी मंदिराला दिलेला भूखंड नियमानुसारच
- कोराडी मंदिराला ६०० कोटी रुपयांची जमीन नाममात्र दरात देण्यात आल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. यावर बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्याला वेडेपणा लागला आहे.
- त्या जमिनीची चार कोटी तीस लाख रुपये मार्केट प्राईस आहे. आता २० लाख रुपये संस्थानने भरले आहेत आणि पुढच्या ३० वर्षात ४ कोटी २० लाख व्हॅल्युएशन आले आहे.
- जेलमध्ये गेलेले लोक आरोप करतात. राऊत यांनी महालक्ष्मी मंदिरात येऊन कुठली जमीन घेतली ते दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.