कामठी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व, सहकार पॅनेलचा विजय; भाजपाला पुन्हा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 14:01 IST2021-10-10T14:00:39+5:302021-10-10T14:01:24+5:30

बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत.

congress dominates Kamathi Bazar Samiti Co operation panel wins | कामठी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व, सहकार पॅनेलचा विजय; भाजपाला पुन्हा धक्का

कामठी बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व, सहकार पॅनेलचा विजय; भाजपाला पुन्हा धक्का

कामठी:  जि.प.च्या पोटनिवडणूकीत तालुक्यातील दोन्ही जागा आणि पंचायत समितीत बहुमत मिळविल्यानंतर कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवीत काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपाला धक्का दिला आहे. बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप समर्थीत एकता परिवर्तन पॅनलला दोन जागावर विजय मिळविता आला आहे. 

बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. तीत सहकार पॅनेलचे दोन उमेदवार आधीच अविरोध झाले होते. त्यामुळे बाजार समितीत सहकार पॅनेलचे संख्याबळ १६ झाले आहे. शनिवारी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी रविवारी कामठी येथील सेठ कसरीमल पोरवाल कॉलेजच्या  केंद्रावर करण्यात आली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सहकार पॅनेलच्या उमदेवारानी आघाडी घेतली होती. या निवडणूक ९८२ पैकी ८८८ मतदारानी मतदानाचा हक्क बाजाविला होता.

कामठी मतदार संघ भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे याचा गड आहे. येथे  भाजपचे टेकचंद सावरकर आमदार आहेत. काँग्रेससाठी येथे मंत्री सुनील केदार आणि जि. प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी मोर्चेबांधणी केली होती.

Web Title: congress dominates Kamathi Bazar Samiti Co operation panel wins