पेट्रोल-डिझेल दरकपातीच्या श्रेयावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 13:40 IST2022-05-23T13:35:59+5:302022-05-23T13:40:07+5:30
शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर अनुक्रमे ९.५० रुपये आणि ७ रुपये प्रति लिटर कमी केला. तेव्हा भाजपने त्याचा मोठा गवगवा केला. परंतु काँग्रेसने यावर टीका केली.

पेट्रोल-डिझेल दरकपातीच्या श्रेयावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने
नागपूर : केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर, रविवारी राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( व्हॅट) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रति लिटर कपात केली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी हाेऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. परंतु, या दरकपातीच्या श्रेयावरूनही काँग्रेस-भाजप आमनेसामने आली असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.
शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर अनुक्रमे ९.५० रुपये आणि ७ रुपये प्रति लिटर कमी केला. तेव्हा भाजपने त्याचा मोठा गवगवा केला. परंतु काँग्रेसने यावर टीका केली. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपची ही बदमाशी असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका संपताच हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्या. त्यात किंचित कमी करून लबाडी केल्याचे म्हटले आहे.
तर भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके म्हणाले की, केंद्राने एक नव्हे तर दोन वेळा दर कमी केले. उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलिंडरच्या किमती २०० ने कमी केल्या. परंतु ज्यांना लोकांशी काहीच देणेघेणे नाही, अशा लोकांचे सरकार सध्या राज्यात आहे, हे दुर्दैव आहे, असे म्हटले.
- १०० रुपयाच्या आत पेट्रोल आणा
दर कमी केले असले तरी ते १०० रुपयापेक्षा अधिकच आहे. इतर राज्याचे पेट्रोलचे दर १०० पेक्षा कमी आले आहेत. इतर भाजप शासित राज्याने जे केले त्याच आधारावर महाराष्ट्रातील सरकारने पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या खाली आणून नागरिकांना दिलासा द्यावा.
आ. प्रवीण दटके, शहराध्यक्ष भाजप
- २०१४ सालच्या दरावर पेट्रोल आणा
२०१४ साली कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १११ डॉलर इतके होते. तेव्हा डिझेलवर एक्साईज ड्यूटी ३ रुपये ४८ पैसे आणि पेट्रोलवर ९ रुपये ५६ पैसे इतकी होती. आज कच्चा तेलाचे दर जवळपास १११ डॉलर इतकेच आहे. परंतु एक्साईड ड्यूटी ३१ रुपये ८० पैसे आणि ३२ रुपये ९० पेसे इतकी आहे. या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांकडून २७ लाख कोटी रुपयांची लूट केली. ती लूट थांबवून केंद्र सरकारने ही एक्साईज ड्यूटी पूर्ववत करावी.
अतुल लोंढे, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस