आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
By योगेश पांडे | Updated: May 7, 2025 10:11 IST2025-05-07T10:10:19+5:302025-05-07T10:11:29+5:30
काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नागपुरातल्या पदाधिकाऱ्याने चक्क एअर स्ट्राईकला टुच्चेपणा म्हटले आहे.

आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
नागपूर : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचे भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील नऊ ट्रेनिंग कॅम्पवर भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केले. काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनीदेखील सैन्याच्या कारवाईचे स्वागत केले. मात्र या स्ट्राईकवरूनदेखील राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नागपुरातल्या पदाधिकाऱ्याने चक्क एअर स्ट्राईकला टुच्चेपणा म्हटले आहे. यामुळे संताप व्यक्त होतो आहे.
युगलकिशोर विदावत असे संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्याचे नाव असून तो काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश विचार विभागाचा प्रदेश उपाध्यक्ष तसेच असंघटित कामगार सेलचा शहराध्यक्ष आहे. बूुधवारी मध्यरात्रीनंतर वायुदलाने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर विदावतने सकाळी पाऊणेसहा वाजताच्या सुमारास फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर स्ट्राईकसारखा ‘टुच्चेपणा’ दाखविणार नाहीत असे लिहीले. आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर स्ट्राईकसारखा टुच्चेपणा दाखविण्याऐवजी स्व.इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे पाकिस्तानचे दोन तुकडे करून देशाच्या सैन्याचे नाव जगात उंचावतील अशी त्याची पूर्ण पोस्ट होती. मात्र एअरस्ट्राईकला टुच्चेपणाची उपमा दिल्यामुळे नेटीझन्समध्ये नाराजीचा सूर आहे. काहींनी यावरून कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावरदेखील टीका केली आहे. कमीत कमी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत तरी राजकारण आणू नये अशी परखड भूमिका नेटीझन्सने विदावतच्या वॉलवर मांडली आहे.