नागपुरात क्रेनमधून जमिनीवर पडला मेट्रोचा काँक्रिट गर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:55 IST2018-07-11T23:52:32+5:302018-07-11T23:55:06+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड सुटल्यामुळे तो जमिनीवर पडला. रात्रीची वेळ असल्यामुळे जीवहानी टळली.

नागपुरात क्रेनमधून जमिनीवर पडला मेट्रोचा काँक्रिट गर्डर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड सुटल्यामुळे तो जमिनीवर पडला. रात्रीची वेळ असल्यामुळे जीवहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत केवळ रात्रीच पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट टाकण्याचे काम अर्थात गर्डर लाँचिंगचे काम होते. मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास अग्रसेन चौकात सेगमेंट पिलरवर टाकण्यासाठी क्रेनला बांधून वर नेण्यात येत होते. त्याचवेळी क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे क्रेनला बांधलेल्या काँक्रिट गर्डरची पकड ढिली झाली आणि अचानक खाली आला. त्याचवेळी महामेट्रोच्या ट्रॅफिक मार्शलने रस्त्यावरील वाहतूक थांबविली. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक होती.
दुसरी क्रेन मागविली
अग्रसेन चौकात क्रेनची पकड सुटल्यामुळे गर्डर सेगमेंट खाली येण्याची घटना घडली. या मार्गावर रात्री वाहतूक नसल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दुसरी क्रेन मागवून गर्डर लाँचिंगचे काम त्वरित सुरू झाले. हे काम दोन तास चालले.
अखिलेश हळवे, डीजीएम (सीसी), महामेट्रो.