रजिस्ट्रीसाठी ‘कमिशन’बाजी, महसूलमंत्र्यांची दुय्यम निबंधक कार्यालयातच धाड
By योगेश पांडे | Updated: October 6, 2025 19:58 IST2025-10-06T19:56:59+5:302025-10-06T19:58:36+5:30
अनियमित पद्धतीने रजिस्ट्री होत असल्याचा दावा : अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे

'Commission' bidding for registry, Revenue Minister raids the Sub-Registrar's office
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रजिस्ट्रीसाठी कमिशनबाजी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रिंग रोडवरील कोतवालनगरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातच धडक दिली. यावेळी तेथील रजिस्ट्री प्रक्रियेत अनियमिततात आढळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रजिस्ट्रीचे सर्व शुल्क ऑनलाईन भरावे लागत असतानादेखील काही अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले. संबंधित पैशांचा स्त्रोत शोधण्यासंदर्भात पोलीस यंत्रणेला बोलविण्यात आले. महसूलमंत्र्यांच्या या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली आहे व अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे.
कोतवालनगर येथील गुलाब अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सह दुय्यम निबंधक वर्ग-२, नागपूर शहर क्र.४ हे कार्यालय आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्री व इतर व्यवहार होत असतात. या कार्यालयात रजिस्ट्री करताना पैसे मागितले जातात. तसेच दस्त नियमित नसतानादेखील रजिस्ट्री लावल्या जातात, अशा तक्रारी बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. त्याच्या आधारावर सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी तेथे धाड टाकली. यावेळी त्यांनी सह दुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कपले यांच्या टेबलवरील ड्रॉवरला कुलूप लागले होते. त्याची चाबी देण्यास अगोदर टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर ते ड्रॉवर उघडल्यावर त्यात काही रोख रक्कम आढळली. त्याचप्रमाणे रजिस्ट्रीच्या प्रक्रियेतदेखील काही प्रमाणात अनियमितता आढळून आली. महसूलमंत्र्यांनी याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याचे पथक कार्यालयात पोहोचले. बावनकुळे तेथून निघाल्यानंतर पोलिसांकडून रोख रक्कम कुठून आली याची विचारणा सुरू होती.
एका रजिस्ट्रीमागे पाच ते आठ हजारांचे कमिशन
संबंधित कार्यालयात एका रजिस्ट्रीमागे पाच ते आठ हजारांचे कमिशन घेतले जात असल्याच्या तक्रारी बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. तसेच तेथे चुकीचे दस्तदेखील लावले जात होते. तीस लाखांहून अधिकची रजिस्ट्री असेल तर आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी लागते. मात्र कार्यालयाकडून तेदेखील केले जात नव्हते.
ड्रॉवरमध्ये रोख रक्कम कशी ?
रजिस्ट्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे तेथे रोख व्यवहारांना स्थानच नाही. मात्र तरीदेखील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .ते पैसे अधिकाऱ्यांचे स्वत:चे होते की आणखी कुठून आले होते याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, संबंधित कार्यालयात एजंट्सच्या माध्यमातून अनेक व्यवहार व्हायचे अशा तक्रारी आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
रजिस्ट्रीसाठी पैसे मागितले तर तक्रार करा
या कार्यालयात आढळून आलेला प्रकार धक्कादायक आहे. ड्रॉवरमध्ये पैसे कुठून आले हे पोलीस चौकशीत समोर येईल. मात्र अनेक ठिकाणी रजिस्ट्रीसाठी अतिरिक्त पैसे मागण्यात येतात. सरकारचा कारभार पारदर्शक आहे व त्यामुळेच जर कुणी रजिस्ट्रीसाठी अतिरिक्त पैसे मागितले तर थेट तक्रार करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. राज्य शासनाकडून रजिस्ट्री प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप राहणार नाही अशी प्रणाली तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.