यावर्षीची सर्वात थंडी रात्र ! विदर्भात नागपूर सर्वात गार, पुढचे ४८ तास गारठा राहणार कायम
By निशांत वानखेडे | Updated: December 6, 2025 20:10 IST2025-12-06T20:04:58+5:302025-12-06T20:10:32+5:30
Nagpur : शनिवारी नागपूरचा रात्रीचा पारा १० अंशाच्या खाली जात ९.६ अंशाची नाेंद झाली. यानुसार शुक्रवारची रात्र हंगामातील सर्वात गारेगार ठरली असून विदर्भात नागपूर सर्वात थंड शहर ठरले.

Coldest night of the year! Nagpur is the coldest in Vidarbha, cold weather will continue for the next 48 hours
नागपूर : शनिवारी नागपूरचा रात्रीचा पारा १० अंशाच्या खाली जात ९.६ अंशाची नाेंद झाली. यानुसार शुक्रवारची रात्र हंगामातील सर्वात गारेगार ठरली असून विदर्भात नागपूर सर्वात थंड शहर ठरले. पुढचे ४८ तास हा गारठा कायम राहणार असून थंड लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यापुढे तापमानात २ अंशाची वाढ हाेण्याचा अंदाज आहे. साेमवारपासून उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू हाेत आहे. त्यामुळे येणाऱ्या राजकीय पाहुण्यांना थंडीचा तडाखा मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी १७ नाेव्हेंबरला किमान तापमान १०.५ अंशावर गेले हाेते. त्यानंतर तापमानात क्रमाक्रमाने वाढ हाेत १७ अंशापर्यंत वाढ झाली हाेती. त्यानंतर डिसेंबर महिन्याचे पहिले दाेन दिवस गारठा कमी राहिला पण ३ तारखेपासून पुन्हा तापमान खाली घसरत गेले. शुक्रवारी रात्रीचा पारा १०.८ अंशावर हाेता, ज्यात २४ तासात १.२ अंशाची घसरण हाेत ९.६ अंशावर तापमान पाेहचले. हे तापमान सरासरीपेक्षा ४ अंशाने कमी आहे. रात्रीसह दिवसाचे तापमानसुद्धा खाली घसरले आहे. शनिवारी २७.८ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली, जे सरासरीपेक्षा २.३ अंशाने कमी आहे. त्यामुळे दिवसाही गारव्याची अनुभूती हाेत आहे.
नागपूरनंतर ९.८ अंश किमान तापमानासह गाेंदिया दुसरे सर्वात थंड शहर ठरले. याशिवाय भंडारा व यवतमाळ १० अंशावर, तर वर्धा व वाशिम ११ ते १२ अंशावर आहेत. उत्तर भारतात सध्या जबरदस्त थंडीची लाट आहे. पंजाबच्या आदमपूरचा रात्रीचा पारा २.२ अंशावर पाेहचला आहे. त्या प्रभावाने विदर्भही गारठला असून पुढचे दाेन दिवस काही जिल्ह्यांना थंड लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. किमान पारा सरासरीपेक्षा ५ अंशाने खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यापुढचे काही दिवस थंडीपासून दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.
सिजनचे सर्वात थंड दिवस
दिवस किमान तापमान (अंशात)
६ डिसेंबर ९.६
५ डिसेंबर १०.८
४ डिसेंबर ११.२
१७ नोव्हेंबर १०.५
१६ नोव्हेंबर १०.८
१८ नोव्हेंबर १०.९
२९ नोव्हेंबर ११.०
३० नोव्हेंबर ११.४