लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या पेपरफूट प्रकरणात अटकेतील आरोपींची कसून चौकशी सुरू असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी बारावीच्या गणिताचा पेपरदेखील फोडला होता. आरोपींच्या फोनमधील डिलीट झालेल्या व्हॉट्सअप चॅटमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका आढळून आली. ही प्रश्नपत्रिका पाठविणाऱ्या पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.
सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बुधवारी (दि.१८) रसायनशास्त्राचा पेपर होता. तेथील एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर आलेला होता, तसेच त्याच ग्रुपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली होती. संबंधित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीचेही नाव सांगितले. विद्यार्थिनींच्या मोबाइलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही पेपर सापडला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहीफळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी 'एक्सआयआय' या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन निशिकांत मूल (४५, मानकापूर) व फरहान अख्तर (१९, कामगारनगर), एक्सेलेन्ट अकॅडमीचा संचालक मुस्तफा खान मुनीर खान (४२, भानखेडा) व जुनेद अहमद (४२, हसनबाग) यांना अटक केली.
विद्यार्थिनी व आरोपींच्या फोनमधील काही चॅट्स डिलीट झाले होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते चॅट्स परत मिळविण्यात आले. त्यात एका आरोपीच्या मोबाइलवर तिन्हाईत व्यक्तीने २१ फेब्रुवारी रोजी गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळेअगोदर पाठविल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात सदरचे ठाणेदार अमोल देशमुख यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
सलग पेपरफुटीने हादरला बोर्ड
नागपूर विभागीय बोर्डासाठी यंदाची बारावी परीक्षा वादांच्या भोवऱ्यात अडकली आहे. सर्वप्रथम भौतिकशास्त्राचा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये सापडला. त्यानंतर रसायनशास्त्राचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत असल्याचे उघड झाले. आता गणिताचाही पेपर फुटल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. सलग तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका बाहेर कशा पडल्या, याबाबत सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सायबर तपासातून डिलीट चॅट्स पुनर्प्राप्त झाल्याने प्रकरणाला तांत्रिक व गुन्हेगारी असा दुहेरी आयाम मिळाला आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविणे हेच प्रशासनापुढील मोठे आव्हान ठरले आहे.
Web Summary : Nagpur police discovered the 12th-grade math paper was also leaked, finding it in deleted WhatsApp chats of arrested individuals. This follows leaks of physics and chemistry papers, raising concerns about exam security and prompting further investigation into the source of the leak.
Web Summary : नागपुर पुलिस ने 12वीं कक्षा के गणित का पेपर भी लीक होने की खोज की, गिरफ्तार व्यक्तियों के डिलीट किए गए व्हाट्सएप चैट में इसे पाया। यह भौतिकी और रसायन विज्ञान के पेपर लीक होने के बाद हुआ है, जिससे परीक्षा सुरक्षा के बारे में चिंता बढ़ गई है और लीक के स्रोत की आगे जांच हो रही है।