मोसंबी मुळासकट उखडले, कापसाची फुले मातीत मिसळले; अतिवृष्टीमुळे गावांकडे न बघवणारे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:27 IST2025-09-27T15:56:25+5:302025-09-27T16:27:43+5:30
सावनेर, कळमेश्वर, कामठी, काटोल तालुक्यांना सर्वाधिक फटका : गाराही बरसल्या, रस्त्यांवर झाडे पडली, वीज बंद, वाहतूक विस्कळीत

Citrus trees uprooted, cotton flowers mixed with soil; Heavy rains create an unsightly sight in the villages
लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/कळमेश्वर : नागपुरात शुक्रवारी सायंकाळी शांतपणे बरसलेल्या पावसाने ग्रामीण भागात मात्र जोरदार तडाखा दिला. यात सावनेर, कळमेश्वर, कामठी आणि काटोल तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. विजांचे तांडव व वादळासह झालेल्या धुवाधार पावसाने शेत-शिवाराची धुळधाण केली.
हातातोंडाशी आलेल्या कापूस, सोयाबीन, भाजीपाला पिकासह संत्रा, मोसंबीच्या बागांना जमीनदोस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती आहे.
सकाळपासून सूर्याच्या तापानंतर दुपारी ४ वाजतापासून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील पिके कोलमडून पडली. कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी मंडळातील संत्रा बागांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली, तर वाऱ्याच्या जोरामुळे झाडावरील फळे गळून पडली. तिडंगी तिष्टी (बु.), तिष्टी (खु.), तेलगाव, नांदिखेडा, मांडवी, पिलकापार, खुमारी, तेलकामठी, सोनोली, देवबर्डी या परिसराला पाऊस व वादळाने अक्षरशः धुवून काढले. कपाशी, सोयाबीन, तूर, भाजीपालाही मातीमोल झाला. या वादळामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून वाहतूक विस्कळीत झाली.
खिंडसी जलाशय १०० टक्के भरले, ओव्हरफ्लो
रामटेक परिसरात सततच्या पावसामुळे खिंडसी जलाशय १०० टक्के भरला असून कधीही ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. जूनपासून २६ सप्टेंबरपर्यंत तहसील क्षेत्रात एकूण ९८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पेंच सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे आणि शाखा अभियंता अजय शेलारे यांनी सांगितले, जलाशय १०० टक्के क्षमतेपर्यंत (१०३ दलघमी) भरला आहे. आणखी पाऊस झाला आणि सुर व कपिला नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल, ज्यामुळे सुर नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कामठीत घरांचे छत उडाले, तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित
याशिवाय कामठी शहरासह तालुक्यातील काही भागांत दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबतच गाराही पडल्या. वादळामुळे झाडे रोडवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. किमान तासभर कोसळलेल्या पावसामुळे रोड व सखल भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. वादळामुळे घोरपड येथील नीलकंठ राऊत यांच्या घराचे छत उडाले व शेजारच्या समीर संतापे यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. आजनी-ड्रॅगन पॅलेस टेम्पल मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रोडला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. रोडवर झाडे पडल्याने कामठी-घोरपड मार्गावरील तसेच गादा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली.
सावनेरच्या केळवदमध्ये मोठे नुकसान, सरसकट भरपाईची मागणी
दुसरीकडे सावनेर तालुक्यातील केळवद सर्कलमधील अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. माळेगाव, जोगा, नांदा, जैतपूर, छत्रापूर, खुरसापार, सावळी, जटामखोरा, रायबाचा, बिडगाव, रामपुरी, जलालखेड़ा, पंढरी, केळवद, हेटी, सालई, उमरी, तेलंगखेडी भागीमारी, नरसाळा, खापा (न) या गावांत धुवाधार पावसाने थैमान घातले.
हातात आलेले मोसंबी पीक पूर्णतः जमिनीवर पडले, तर आंबिया बहराच्या संत्र्यांची झाडावरून मोठ्या प्रमाणात गळती झाली. या भागातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे तब्बल ७५ टक्के झाडे कोलमडली. कापसाची फुले व पाती जमिनीवर गळून मातीत मिसळली. काही शेतकन्यांचे गोठे शेतात असल्याने टिनपत्रे उडून गोठ्यांचेही नुकसान झाले. परिसरात वीज पुरवठाही खंडित झाला होता. या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सोयाबीन, कापूस, संत्रा व मोसंबी पिकाच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी होत आहे.