Chipko agitation in Nagpur to save Marathi school | मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन'
मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात 'चिपको आंदोलन'

ठळक मुद्देशेकडो मुले व नागरिकांनी कवटाळले शाळेला : मोहल्ला सभा घेऊन पालकांशी संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षात मराठी भाषिक सरकारी शाळांना घरघर लागली आहे. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शाळा बंद पडत आहेत किंवा पटसंख्येचे कारण देत बंद पाडल्या जात आहेत. शाळांच्या या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी शेकडो विद्यार्थी व पालकांनी जोगीनगर, रिंग रोडच्या भीमनगर मराठी प्राथमिक शाळेला कवटाळून शाळा वाचविण्यासाठी आपल्या संवेदना प्रकट केल्या.
सरकारी शाळा वाचवा अभियानाअंतर्गत सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीतर्फे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या लक्ष वेधण्यासोबत सामान्य नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. सुरूवातीला लाल शाळा आणि त्यानंतर सोमलवाडा येथील सरकारी शाळेत चिपको आंदोलन करण्यात आली. या अभियानाचा तिसरा टप्पा शुक्रवारी मानेवाडा रिंग रोडच्या जोगीनगर येथे सरकारी शाळेत पार पडला. वस्तीतील १५० च्यावर विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या शाळेला कवटाळून शाळा बंद करण्याचा महापालिका प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला. इंग्लिश मिडीयमच्या खासगी शाळांचे शुल्क भरमसाठ वाढले आहे, जे गरीब व मध्यमवर्गीय पालकांनाही परवडणारे नाही. पटसंख्येच्या कारणाने शहरातील महापालिकेच्या १९१ पैकी ५२ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सरकारी शाळा बंद झाल्या तर गरीब मुलांचे शिक्षणच बंद होईल, त्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागेल, ही भीती या आंदोलनातून व्यक्त करण्यात येत आहे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या शाळा बंद पडत आहेत. मात्र, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शाळा बंद पाडून कोट्यवधीच्या या जमिनी हडपण्याचे तर षडयंत्र असल्याची शंका संयुक्त कृती समितीने व्यक्त केले. या शाळा बंद होऊ नये व नागरिकांनी त्यासाठी समोर येउन लढण्यासाठी हे आंदोलन चालले असल्याचे कृती समितीचे संयोजक दीपक साने यांनी व्यक्त केले.

Web Title: Chipko agitation in Nagpur to save Marathi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.