फेसबुक अकाऊंट हॅक, १०-१२ दिवसांपासून अश्लील पोस्ट, शेफ विष्णू मनोहर ढसाढसा रडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 21:19 IST2025-03-10T21:17:03+5:302025-03-10T21:19:03+5:30
Vishnu Manohar facebook: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबुक खातं हॅक करण्यात आले असून, त्यावरून अश्लील पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

फेसबुक अकाऊंट हॅक, १०-१२ दिवसांपासून अश्लील पोस्ट, शेफ विष्णू मनोहर ढसाढसा रडले
Vishnu Manohar News: ज्यांच्या पाककलेची चर्चा जगभरात होते, ते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर एका पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. विष्णू मनोहर यांचे 'मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर' हे फेसबुकवरील खाते हॅक करण्यात आले आहे. गेल्या दहा ते १२ दिवसांपासून हॅकर्स या खात्यावर अश्लील पोस्ट टाकत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे कॉल त्यांना येत असून, ही व्यथा सांगताना विष्णू मनोहर यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 'मास्टर रेसीपी बाय विष्णू मनोहर' हे ते चालवत असलेले फेसबुक खाते हॅक झाले असल्याची माहिती दिली.
"दहा ते १२ दिवसांपासून मानसिक त्रास सहन करतोय"
विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यासंदर्भात पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आहे. पण, दहा ते १२ दिवस झाले तरीही 'मास्टर रेसीपी बाय विष्णू मनोहर' हे खात रिकव्हर करण्यात आलेले नाही. या खात्यावरून अश्लील पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असे ते म्हणाले.
दोन हजार रेसिपी अन् लाखो फॉलोअर्स
फेसबुक खाते हॅक झाल्यानंतर विष्णू मनोहर यांनी नागपूर, बंगळुरू, मुंबई, पुणे त्याचबरोबर अमेरिकेमध्येही तक्रार केली. यासंदर्भात त्यांनी फेसबुकची मूळ कंपनी मेटा सोबतही संपर्क केला. इतका खटाटोप करूनही त्यांचे अकाऊंट रिकव्हर झालेले नाही नसल्याने त्यांना दुःख अनावर झाले.
विष्ण मनोहर यांच्या या अकाऊंटवर तब्बल २ हजार रेसिपी आहेत. त्यांचे लाखो फॉलोर्सही आहेत. मात्र, गेल्या दहा ते १२ दिवसांपासून हॅकर्सकडून अश्लील पोस्ट केल्या जात असून, फॉलोअर्सची संख्या कमी होऊ लागली आहे.
अश्लील पोस्ट का करत आहात?
विष्णू मनोहर म्हणाले, "माझे फॉलोअर्स मला सोडून जात आहेत. त्याचबरोबर अनेकजण मला मोबाईलवर मेसेज करत आहेत आणि विचारत आहेत की, 'अशा अश्लील पोस्ट का करत आहात?' या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे अकाऊंटही हॅक होऊ शकते. त्यामुळे चाहत्यांनी या लिंकवर क्लिक करू नये", असे आवाहन त्यांनी केले आहे.