नागपुरात कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसवर सीबीआयची धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 22:36 IST2018-09-19T22:35:53+5:302018-09-19T22:36:48+5:30
कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत.

नागपुरात कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसवर सीबीआयची धाड
लोकमत न्यूज नटवर्क
नागपूर : कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा सीबीआयच्या अधिकाऱ्यांची एक चमू कॉर्पोरेट इस्पातच्या आॅफीसमध्ये धडकली. सकाळी सुमारे ९.३० वाजता ही कारवाई सुरू झाली ती सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चालली. या धाडीत सीबीआयने काही दस्तावेज किंवा इतर किमती साहित्य जप्त केले की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. विश्वस्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट इस्पात कंपनीने बिहारमध्ये १३३० मेगावॅट क्षमतेच्या विद्युत संयंत्राची योजना तयार केली होती. याच संयंत्रासाठी २००७ साली कंपनीला बिहारमधील लातेहार जिल्ह्यातील कोल ब्लॉक वितरित करण्यात आले होते. यानंतर २०१२ मध्ये या गोष्टीचा खुलासा झाला की, कंपनीने अनुचित पद्धतीने हा कोल ब्लॉक मिळविला होता. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या वितरणासोबतच अन्य २०४ कोल ब्लॉकचे वितरणही रद्द केले होते.
सविस्तर तपासानंतर सीबीआयने कॉर्पोरेट इस्पातच्या निदेशकांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यात मनोज जयस्वाल यांच्याशिवाय त्यांची दोन मुले अभिषेक आणि अभिजित व कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सूत्रानुसार बुधवारची कारवाई ही याच प्रकरणाशी जुळलेली आहे.