सावधान...रेल्वे मार्गांच्या आसपास पतंग उडविणे टाळा करंटमुळे धोका होण्याची भीती : रेल्वे प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 23:54 IST2026-01-12T23:53:36+5:302026-01-12T23:54:24+5:30
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीला सर्वत्र जोर चढतो. नागपुरात तर अक्षरश: उधाणच येते. अनेक पतंगबाज निष्काळजीपणे पतंगीचा खेळ करून अनेकांच्या जीवितांशी खेळ करतात.

सावधान...रेल्वे मार्गांच्या आसपास पतंग उडविणे टाळा करंटमुळे धोका होण्याची भीती : रेल्वे प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मार्गाच्या (रुळांच्या) आजूबाजूला राहून पतंग उडविणे प्रचंड धोकादायक आहे. त्यामुळे पतंगबाजी करणाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या आसपास राहून पतंग उडवू नये, असे आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीला सर्वत्र जोर चढतो. नागपुरात तर अक्षरश: उधाणच येते. अनेक पतंगबाज निष्काळजीपणे पतंगीचा खेळ करून अनेकांच्या जीवितांशी खेळ करतात. कुणाचा गळा, कुणाचा चेहरा, नाक, कान, कापले जाते तर काही निरपराधांचे बळीही घातक मांजामुळे जातात. दरवर्षी असे प्रकार घडतात. त्यामुळे पतंगबाजांनी घातक नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन दरवर्षी केले जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून मांजा विक्रेते आणि पतंगबाज अनेक निरपराधाच्या जिवाशी खेळत असतात. हे करतानाच कुणी चक्क रेल्वे लाईनच्या मध्ये किंवा आसपास राहून पंतग उडवितात.
विशेष म्हणजे, शहरात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागांची दोन स्वतंत्र मुख्यालये आहेत. या विभागीय मुख्यालयातर्फे संचालित केल्या जाणाऱ्या रेल्वेचे परिचालन २५,००० व्होल्ट क्षमतेच्या उच्च दाबाच्या विद्युत ओव्हरहेड तारांद्वारे केले जाते. या विद्युत तारांमध्ये २४ तास वीज प्रवाह सुरू असतो. पतंगाचा मांजा (विशेषतः ओला, धातूयुक्त किंवा सिंथेटिक मांजा) जर या उच्च-दाब विद्युत तारांमध्ये अडकला, तर विद्युत प्रवाह थेट पतंग उडविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे गंभीर अपघात किंवा प्राणहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविणाऱ्यांनी हा धोका लक्षात घेऊन रेल्वे लाईनच्या आजूबाजूला पतंग उडवू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी, पोलिसांनी घालावा आवर
शहरातील चारही दिशांचा रेल्वे मार्ग दाट लोकवस्तीतून गेला आहे. खास करून अजनी, नरेंद्रनगर, मनीषनगर, सोमलवाडा, शिवणगाव, वर्धा मार्ग तसेच कोराडी, कामठी मार्ग, गिट्टीखदान काटोल मार्ग आणि इतवारी, कळमना भागातून गेलेल्या रेल्वे रुळांच्या बाजूला रोज अनेक जण पतंगबाजी करताना दिसतात. त्या त्या भागातील नागरिकांनी, पोलिसांनी करंटचा धोका लक्षात घेऊन पतंगबाजीला आवर घालावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.