‘तू दहशतवादी आहेस’ असे म्हणत अफगाणिस्तानमधील व्यापाऱ्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 23:09 IST2025-07-28T23:07:26+5:302025-07-28T23:09:05+5:30
नागपूर: अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत प्राणघातक हल्ला करण्यात आला.

‘तू दहशतवादी आहेस’ असे म्हणत अफगाणिस्तानमधील व्यापाऱ्यावर हल्ला
नागपूर: अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. काश्मिरी तरुण फहीम खान मामातुर मर्जक (४६, मोठा ताजबाग, सरताज कॉलनी) हे शहरात फिरून ब्लँकेट विकतात.
फहीम खानमुळचे अफगाणिस्तान येथील पक्तिका राज्यातील निवासी आहेच. मागील सात वर्षांपासून ते नागपुरात ब्लॅंकेट विकण्याचे काम करत आहे. २७ जुलै रोजी परिचित व्यक्तीसोबत ते एका कारमध्ये जुन्या ग्राहकाकडे फ्रीज बघायला गेले होते. रात्री साडेअकरा वाजता ते स्वीपर कॉलनीत फ्रीज पहायला गेले. रात्री पावणेबारा वाजता ते कारने परत जायला निघणार असताना पार्किंगजवळ एका तरुणाने त्यांना गाठले व फहीम यांना तू दहशतवादी आहेस व इथे यायचे नाही, असे म्हटले.
फहीम यांनी ते कपडा व्यापारी असल्याचे सांगितले. मात्र तरुणाने त्यांना धमकावले. त्यानंतर त्याने फहीम यांना मारायला सुरुवात केली. फहीम यांच्या साथीदारांनी मध्यस्थी केली. मात्र तेवढ्यातच आणखी दोन आरोपी एमएच ४९ बीजी ३८१९ या दुचाकीने पोहोचले. त्यांनीदेखील मारहाण सुरू केली. पहिल्या आरोपीने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने फहीम यांच्या डोक्यावर प्रहार केले. त्यात ते जखमी झाले. मी वस्तीतील दादा असून माझे कुणी काहीच बिघडवू शकत नाही.
जर पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारेन अशी धमकी आरोपीने दिली. डोके दुखत असल्याने फहीम बेशुद्ध झाले. ते शुद्धीवर आल्यावर आरोपींनी त्यांनी आणलेल्या कारवर दगडफेक करत काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. फहीम यांच्या तक्रारीवरून हल्ला करणारा अजय चव्हाण (३०), ऋषी (२०) व मयंक (१९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.