ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:54 IST2026-02-24T13:53:34+5:302026-02-24T13:54:25+5:30
विमानाने आपत्कालीन लँडिंगच्या परवानगी मागितल्यानंतर प्रशासनानेही सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.

ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
नागपूर - लंडनहून हैदराबादच्या दिशेने जाणारं ब्रिटिश एअरवेजचं विमाननागपूरविमानतळावर अचानक उतरवण्यात आले आहे. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी पहाटे नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पायलटच्या सतर्कतेमुळे या विमानातील १६९ प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
माहितीनुसार, ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७८७ हे विमान लंडनहून हैदराबादला निघाले होते. त्याच वेळी विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटला आढळले. हैदराबाद येथील वातावरण खराब असल्याने तिथे लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली. परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने हे विमान नागपूरच्या दिशेने वळवले. त्याठिकाणी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. नागपूर एटीसीने परवानगी दिल्यानंतर हे विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. विमानाने आपत्कालीन लँडिंगच्या परवानगी मागितल्यानंतर प्रशासनानेही सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
२४ तासांत चौथी घटना
मागील २४ तासांत विमानाशी निगडित ही चौथी घटना आहे. झारखंड येथील चतरा येथे सोमवारी संध्याकाळी एअर अॅम्ब्युलन्स दुर्घटनेत डॉक्टर, रुग्णासह सर्व ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या एअर अॅम्ब्युलन्समधून रांचीहून रुग्णाला दिल्ली नेण्यात येत होते. रुग्णाच्या कुटुंबाने आधुनिक उपचारासाठी रुग्णाला दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. एअर अॅम्ब्युलन्सने रांची विमानतळावरून संध्याकाळी ७.१० वाजता त्यांनी उड्डाण घेतले. त्यानंतर ७.३४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. या विमानाचा शेवटचा संपर्क कोलकाता एअर कंट्रोलशी झाला होता. विमानाचा रडार संपर्क वाराणसीच्या दक्षिण पूर्वेकडील १०० एनएम अंतरावर तुटला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंटोलनुसार या विमानाने त्यांच्याशी संपर्क केला नव्हता. त्यानंतर चतरा येथील जंगलात हे विमान कोसळल्याचे समोर आले.
मंगळवारी सकाळी अंदमानमध्ये पवन हंस हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणानंतर काही वेळातच ते समुद्रात कोसळल्याची घटना घडली. या विमानात किमान सात जण होते, त्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरहून मायाबंदरला जात होते. उड्डाणानंतरच पायलटला तांत्रिक बिघाडाची जाणीव झाली. त्यामुळे त्यांच्याकडे समुद्रात क्रॅश-लँडिंग करण्याचा पर्याय होता. या घटनेत प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झाली. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दिल्लीतही एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. दिल्लीहून लेहच्या दिशेने झेपावलेल्या स्पाइसजेटच्या विमानात मंगळवारी सकाळी उड्डाणानंतर काही वेळातच मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. विमानाने हवेत झेप घेताच प्रवाशांना खिडकीबाहेर इंजिनमधून आगीच्या ज्वाळा आणि ठिणग्या दिसू लागल्या. या भयानक दृश्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान तातडीने पुन्हा दिल्ली विमानतळाच्या दिशेने वळवले आणि सुरक्षित लँडिंग केले.