सेतूतील दलालांचे धाबे दणाणले
By Admin | Updated: June 2, 2017 02:38 IST2017-06-02T02:38:35+5:302017-06-02T02:38:35+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयातील कारभार पारदर्शक चालण्याच्या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी

सेतूतील दलालांचे धाबे दणाणले
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली आकस्मिक पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयातील कारभार पारदर्शक चालण्याच्या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी गुरुवारी दुपारी अचानक सेतू कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या अचानक येण्याने दलालांचे धाबे दणाणले. कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला. परंतु यावेळी एकही दलाल त्यांच्या हाती लागला नसल्याचे सांगितले जाते.
१२ वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यानंतर १० वी च्या परीक्षेचेही निकाल जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध प्रमाणपत्राची गरज असते. हे सर्व प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रातून मिळतात. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी असते. याचा काही लोक गैरफायदा घेतात. येथील गर्दी टाळून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सुरू केली. मात्र त्यानंतर सेतूतील गर्दी कायम आहे. त्यामुळे येथे पुन्हा दलाल सक्रिय झाले आहे. येथील काही कर्मचाऱ्यांचा दलालांशी संबंध आहे. त्यामुळे अशा लोकांचे काम लवकर होते. यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत अनेक दलाल पोलिसांच्या हाती लागले होते. त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ते पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा असून दलालांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कुर्वे यांना मिळाल्या.
आज निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक सेतू केंद्राला भेट दिली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. दलालांनी काढता पाय घेतल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विनाकामाच्या लोकांना बाहेर काढण्यात आले. कामाच्या लोकांनाच आत प्रवेश देण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना त्यांनी दिल्या.