सामूहिक अत्याचारात मुलगा अडकला, वडिलांना आला हार्टअटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:59 IST2026-02-11T16:59:14+5:302026-02-11T16:59:59+5:30
Nagpur : नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचादेखील समावेश असून त्यांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कुकृत्य केले.

Boy gets caught in gang rape, father suffers heart attack
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचादेखील समावेश असून त्यांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कुकृत्य केले. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पीडिता अकरावीची विद्यार्थिनी आहे. तर एक आरोपी बारावीचा विद्यार्थी आहे. दोघांचाही एकमेकांशी परिचय होता. आरोपीने तिच्याशी याअगोदर अश्लील वर्तन केले होते. त्यामुळे ती त्याला टाळत होती. मात्र त्याने वारंवार मॅसेजेस केल्याने तिने बोलण्याची तयारी दाखविली. आरोपीने तिला घरी बोलविले. घरी इतरही सदस्य असतील असे वाटल्याने ती ५ फेब्रुवारी रोजी त्याला भेटायला गेली. मात्र प्रत्यक्षात त्याच्यासोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र होते.
बोलण्याच्या बहाण्याने तो तिला आतील खोलीत घेऊन गेला व तेथे अत्याचार केला. बाहेरील दोन आरोपींनी मोबाईलवर व्हिडीओ बनविला असल्याची बतावणी केली व तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडिता पूर्णतः हादरली होती. तिने अखेर याची माहिती कुटुंबीयांना दिली व नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तीनही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. नंदनवनचे ठाणेदार कैलास देशमाने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
खरोखरच काढला होता का व्हिडीओ ?
दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचाराचा व्हिडीओ काढल्याचा दावा करत तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यातील एकाने पीडितेवर अत्याचार केला. आरोपींनी खरोखरच व्हिडीओ काढला होता का याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची तपासणी सुरू आहे.
अभ्यासाऐवजी मुलीला इम्प्रेस करण्यावर भर
पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव जाहीर केलेले नाही. संबंधित आरोपी बारावीचा विद्यार्थी असून मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता. मात्र पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्याने पेपर दिलाच नाही. अभ्यास करण्याऐवजी मुलीला इम्प्रेस करण्यावर त्याचा भर होता. त्याने केलेल्या कुकृत्याची माहिती मिळताच त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा धक्का बसला. ते दवाखान्यात दाखल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.