Sana Khan murder case : २०८ पानांचे आरोपपत्र, पाच आरोपींविरुद्ध खटला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:06 PM2023-11-24T14:06:32+5:302023-11-24T14:07:19+5:30

सहा गंभीर गुन्ह्यांचा समावेश : सत्र न्यायालयात चालेल खटला

BJP Sana Khan murder case : 208-page charge sheet, case filed against five accused | Sana Khan murder case : २०८ पानांचे आरोपपत्र, पाच आरोपींविरुद्ध खटला दाखल

Sana Khan murder case : २०८ पानांचे आरोपपत्र, पाच आरोपींविरुद्ध खटला दाखल

नागपूर : राज्य सरकारने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी हीना ऊर्फ सना मोबीन खान (३४) यांच्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार अमित ऊर्फ पप्पू रज्जनलाल साहू (३८) याच्यासह पाच आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. सरकारच्या वतीने अनुभवी ॲड. रश्मी खापर्डे खटल्याचे कामकाज पाहणार आहेत.

इतर आरोपींमध्ये राजेशसिंग सूरजसिंग ठाकूर (४०, रा. फुलर भिटा, ता. शाहपुरा), धर्मेंद्र रविशंकर यादव (३७, रा. शास्त्रीनगर, जबलपूर), रविशंकर ऊर्फ रब्बू चाचा भगतराम यादव (५५, रा. शास्त्रीनगर, जबलपूर) व कमलेश कालूराम पटेल (३५, रा. गुप्तानगर, जबलपूर) यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध २०८ पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. त्यात भारतीय दंड विधानातील कलम ३६४ (अपहरण), ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे), १२०-ब (कट रचणे), ५०४ (अपमान करणे) व ५०६ (धमकी देणे) या सहा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

सना व अमित मित्र होते

सना व अमित मित्र होते. ते घटनेच्या एक ते दीड वर्षापूर्वीपासून संपर्कात होते. कटंगी येथील आशीर्वाद ढाब्यामध्ये त्यांची भागीदारी होती. त्याकरिता सनाने अमितला २७ ग्रॅम सोन्याची चेन व मोठी रक्कम दिली होती. ती साहूला भेटण्यासाठी नेहमीच जबलपूरला जात होती. इतर आरोपींसोबतही तिची ओळख होती.

आर्थिक व्यवहारावरून झाला होता वाद

सना व अमितचा आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. ते १ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९ च्या सुमारास फोनवरून एकमेकांसोबत भांडले. दरम्यान, सनाने अमितला सोन्याची चेन व पैसे परत मागितले. अमितने प्रत्यक्ष बोलून चर्चा करण्यासाठी तिला जबलपूरला बोलावले. त्यामुळे सना त्याच दिवशी रात्री १२ च्या सुमारास इंदोरा येथून ट्रॅव्हल्सने जबलपूरला रवाना झाली. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता भाचा इम्रान खानला फोन करून जबलपूरला पोहोचल्याची माहिती दिली.

सनाचा फोन बंद झाला

आई मेहरुनिशा मोबीन खान यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास सनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद होता. त्यानंतर त्यांनी अमितला फोन केला. अमितने सना भांडण करून निघून गेल्याची व ती कुठे गेली याची माहिती नसल्याचे सांगितले. पुढे त्याचाही फोन बंद झाला. परिणामी, मेहरुनिशा यांनी सना बेपत्ता झाल्याची तक्रार ३ ऑगस्ट २०२३ रोजी मानकापूर पोलिस ठाण्यामध्ये नोंदविली.

सनाची हत्याच झाल्याचा दावा

या प्रकरणाचा तपास पोलिसांकरिता विविध बाबतीत आव्हानात्मक ठरला. अनेक प्रयत्न करूनही त्यांना अद्याप सनाचा मृतदेह मिळाला नाही. असे असले तरी, त्यांनी सनाची हत्या झाली आहे आणि हा गुन्हा आरोपींनी केला आहे, असा दावा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर केला आहे. आरोपींनी सनाचा मृतदेह मेरेगावजवळच्या पुलावरून हिरेन नदीमध्ये फेकला. तिची हॅण्डबॅग भटोली गावाजवळच्या पुलावरून नर्मदा नदीमध्ये फेकली. तिचे दोन मोबाइल फोनही नर्मदा नदीमध्ये नष्ट करण्यात आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

आरोपींविरुद्ध आहेत परिस्थितीजन्य पुरावे

आरोपींविरुद्ध विविध परिस्थितीजन्य पुरावे आहेत. गिल फार्म, राजुल टाऊनशिप, तिलहरी, जबलपूर येथील अमितच्या घरात सनाचे रक्त लागलेली लोखंडी बेसबॉल बॅट, कापडी पडदे, बनियान व पायपुसणे मिळून आले आहे. ते रक्त आई मेहरुनिशा व मुलगा अल्तमशच्या रक्तासोबत जुळले आहे. धुमा घाट परिसरात सना खानचे वस्त्र व अल्तमेशच्या आधार कार्डची झेरॉक्स सापडली आहे. धर्मेंद्रच्या घरातून अमितचे दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. मोबाइल सीडीआरवरून आरोपी गुन्ह्यांच्या ठिकाणी गेले होते, हे स्पष्ट होत आहे. पोलिस निरीक्षक शुभांगी प्रकरणाचा तपास केला आहे.

Web Title: BJP Sana Khan murder case : 208-page charge sheet, case filed against five accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.