भाजप नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण नागपtरचे आमदार म्हणतात स्वबळावर लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 21:33 IST2025-11-18T21:33:22+5:302025-11-18T21:33:28+5:30
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला भाजपकडून सुरुवात झाली आहे.

भाजप नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण नागपtरचे आमदार म्हणतात स्वबळावर लढा
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून शक्य असेल तिथे महायुतीतील घटकपक्ष सोबत निवडणूक लढतील अशी भूमिका मांडत आहेत. मात्र नागपुरातील भाजप लोकप्रतिनिधींनी मात्र स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढीस लागला आहे. दुसरीकडे स्वबळावर निवडणूक लढण्याच्या विचारातूनच इच्छुकांकडून तिकीटासाठी ‘लॉबिंग’ करण्यास सुरुवात झाली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला भाजपकडून सुरुवात झाली आहे. सोमवारी पुर्व नागपुरातील सर्व प्रभागांतील इच्छुकांशी पक्षनेत्यांनी ‘वन टू वन’ संवाद साधला व चर्चा केली. यावेळी त्यांच्याकडून निवडणूक स्वबळावर लढवायची की महायुतीत राहून लढायची याबाबतदेखील विचारणा करण्यात आली. बहुतांश इच्छुक उमेदवारांनी स्वबळाचाच मुद्दा लावून धरला होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री हे दोघेही तेथे फारशी अडचण नसेल तिथे महायुती व्हावी याच मताचे आहेत. तसे त्यांनी सार्वजनिकरित्या बोलूनदेखील दाखविले आहे. नागपुरातील लोकप्रतिनिधी व आमदारदेखील आता स्वबळाची भाषा करू लागले आहे. त्यामुळे नागपुरात भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांनीदेखील संकेत दिले आहेत. तब्बल ८ वर्षांनी मनपाची निवडणूक होत आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून कार्यकर्त्यांच्याच स्वाभिमानाचा मुद्दा आहे. लोकसभा व विधानसभा या केंद्र व राज्य सरकारच्या निवडणूका असल्यामुळे त्यात महायुति होणे योग्य आहे. परंतु मनपा निवडणूक ही बूथपासून निर्माण होणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. भाजप विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे. कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह असून कार्यकर्त्याची भावना लक्षात घेता स्वबळावर निवडणूक लढण्याची भाजपची तयारी आहे व कार्यकर्त्यांचीदेखील तीच भावना आहे, असे खोपडे यांनी स्पष्ट केले.
भाजपला फटका नाहीच
नागपुरात भाजपचे घटकपक्ष असलेल्या शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांचा अद्यापही हवा तसा प्रभाव नाही. भाजपचे प्रत्येक बूथवर संघटन व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मनपा निवडणूकीत महायुती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला हिरवी झेंडी मिळाली तर त्याचा भाजपला कुठलाच फटका बसणार नाही असे चित्र आहे.