भाजपने लोकप्रतिनिधींकडे निवडणुकांची जबाबदारी न देता भेंडे, गजभिये, पोतदार यांच्यावर सोपवली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:56 IST2025-11-06T15:55:08+5:302025-11-06T15:56:04+5:30
प्रवीण दटके जिल्हा प्रभारीः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

BJP instead of giving the responsibility of elections to people's representatives, entrusted the responsibility to Bhende, Gajbhiye, Potdar
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने लोकप्रतिनिधींकडे नियोजनाची जबाबदारी न देता नागपूर जिल्ह्यात संघटनेतील अनुभवी नेत्यांवर विश्वास टाकला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये व डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे नागपूर जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांना संपूर्ण जिल्ह्याचे प्रभारी बनविण्यात आले आहे. या नेत्यांच्या मार्गदर्शनातच नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा व नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे नियोजन होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची परीक्षा राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मिळालेले यश व शहरात कायम राखलेल्या चार जागा यामुळे आगामी निवडणुकीत त्याहून चांगली कामगिरी करण्याचे पक्षासमोर आव्हान आहे. विधानसभेत भाजपच्या मदतीला लाडक्या बहिणी धावल्या होत्या. मात्र, आता अशा योजनेचा थेट आधार पक्षाला मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असल्याने ग्रामीण व शहरी भागातील निवडणुकीच्या आकड्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर शहर तसेच नागपूर जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली. संघटनेचा अनुभव असलेल्या संजय भेंडे, अरविंद गजभिये व डॉ. राजीव पोतदार यांची नावे यासाठी निश्चित करण्यात आली. संजय भेंडे यांना नागपूर शहर निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे. नागपूर ग्रामीणचे पक्षाने अगोदरच संघटनात्मकरीत्या दोन भाग केले आहेत. नागपूर जिल्ह्याचे (रामटेक) निवडणूक प्रमुख म्हणून अरविंद गजभिये तर नागपूर जिल्हा (काटोल) येथील निवडणूक प्रमुखपदी डॉ. राजीव पोतदार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.