विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:42 PM2019-10-25T23:42:56+5:302019-10-25T23:43:50+5:30

भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.

BJP falling due to Vidarbha issue: Vidarbha state agitation committee | विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

विदर्भाचा मुद्दा डावलल्याने भाजपची घसरण : विदर्भ राज्य आंदोलन समिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. या वेळीही या विषयावर ते काहीच बोलले नसल्याने विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.
२४ ऑक्टोबरच्या निकालानंतर विदर्भ आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून विदर्भातील जनतेने भाजपाचे ४४ आमदार निवडून दिले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता बसली. १२३ आमदारांपैकी ४४ आमदारांचा मोठा गट विदभार्तून निवडून जाऊनही या आमदारांनी विदर्भाबद्दल कोणतीही भूमिका घेतली नाही. सत्ता मिळताच भाजपाने विदर्भातील जनतेला धोका दिला. विदर्भ राज्याची निर्मिती केली नाही. विदर्भाच्या प्रश्नासोबतच शेतकरी, बेरोजगार, आर्थिक मंदी या प्रश्नावरसुद्धा भाजपाने लक्ष दिले नाही, त्याचाच हा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या पाच वर्षभर भाजपविरोधात वातावरण तयार केले. २०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातील जनता भाजपला विदर्भातून हद्दपार करेल, असे प्रत्येक वेळी ठणकावून सांगितले होते. या जनजागृतीचा हा परिणाम असून भाजपाच्या १५ जागा विदभार्तून कमी करण्यासाठी मात्र विदर्भाचा मुद्दाच कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाने या निकालापासून धडा घ्यावा. विदर्भ राज्य आंदोलन समिती पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: BJP falling due to Vidarbha issue: Vidarbha state agitation committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.