भाजप सर्व जातींना आपल्याकडे ओढते, पण काम कुणाचेच करीत नाही ; बच्चू कडू यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:45 IST2025-12-11T18:44:12+5:302025-12-11T18:45:49+5:30
Nagpur : सर्व जाती धर्माचे लाेक शेतकरी आहेत, पण शेतकऱ्यांनाही या सरकारने देशाेधडीला लावल्याचा आराेप कडू यांनी केला.

BJP attracts all castes but does not work for anyone; Bachchu Kadu's criticism
नागपूर : भाजपच्या नेत्यांकडे भुलथापा देण्याचे खास तंत्र आहे. भाजपचे लाेक धर्माच्या, जातीच्या नावाने या तंत्राने सर्व जातींना आपल्याकडे ओढतात, परंतू फायदा किंवा काम काेणत्याच जातींच्या लाेकांचे करीत नाही, अशी घणाघाती टीका माजी आमदार बच्चू कडे यांनी हलबा समाजाच्या विद्राेह आंदाेलनात सहभागी हाेत केली.
हलबा समाजातर्फे आदिवासी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गांधीबाग येथे विद्राेह आंदाेलन सुरू आहे. यामध्ये हलबा क्रांती सेनेचे अध्यक्ष जगदीश खापेकर आणि हलबा अभ्यासक डाॅ. सुशील काेहाड हे दाेन कार्यकर्ते अधिवेशन सुरू झाल्यापासून आमरण उपाेषणाला बसले आहेत. गुरुवारी या आंदाेलनात बच्चू कडे सहभागी झाले हाेते. ते म्हणाले, पूर्वी विदर्भवीर जांबुवंतराव धाेटे यांच्या नावाने नागपूरच्या हलबांची ओळख हाेती. मात्र भाजपने आपल्या खास तंत्राने हलबांना आपल्याकडे ओढले, मात्र इतकी वर्षे लाेटूनही या समाजासाठी त्यांनी काहीही केले नाही. अशाचप्रकारे भाजप सरकारने राज्यातील सर्व जातीपातीसाठी ५२ महामंडळे स्थापन केली, मात्र वर्षभरात या महामंडळांना एक रुपया निधी दिला नाही, केवळ महामंडळाचे गाजर वाटले. यांच्या मनगटात समाजाचे काम करण्याची धम्मक नाही, अशी टीका त्यांनी केली.
सर्व जाती धर्माचे लाेक शेतकरी आहेत, पण शेतकऱ्यांनाही या सरकारने देशाेधडीला लावल्याचा आराेप कडू यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाेड बाेलून तुम्हाला आपल्या मागे गाेल गाेल फिरविणार, परंतू पुढचे ५० वर्षे त्यांच्या मागे फिरल्यानंतरही तुमच्या समाजाला न्याय मिळणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे सरकारचे नाक दाबल्याशिवाय ताेंड उघडणार नाही. तेव्हा हलबा समाजाच्या नेत्यांनी साेबत बैठक घेऊन पुढच्या आंदाेलनाचे नियाेजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला माजी महापाैर दीपराज पार्डीकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण भिसीकर, दीपक देवघरे, पुरुषोत्तम सेलुकर, रमेश बारापात्रे, विलास पराते, चेतन निखारे, भास्कर पराते, शुभम पौनिकर, जीजाबाई धकाते, पुष्पाताई पाठराबे, गीताताई पार्डीकर आदी उपस्थित हाेते.
शुक्रवारी जलसमाधी आंदाेलन
हलबा समाजातर्फे या सत्रात जलसमाधी आंदाेलनाचाही इशारा दिला आहे. समाज बांधवांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नाईक तलाव येथे आंदाेलनात सहभागी हाेण्याचे आवाहन केले.