पक्ष्याची विमानाला धडक; वैमानिकाच्या तत्परतेमुळे २७२ प्रवाशांचा जीव वाचला

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 2, 2025 17:44 IST2025-09-02T17:42:30+5:302025-09-02T17:44:23+5:30

इंडिगोचे नागपूर-कोलकाता विमान : ५० प्रवासी नागपूर-दिल्ली विमानाने रवाना

Bird hits plane; Pilot's quick action saves 272 passengers | पक्ष्याची विमानाला धडक; वैमानिकाच्या तत्परतेमुळे २७२ प्रवाशांचा जीव वाचला

Bird hits plane; Pilot's quick action saves 272 passengers

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
प्रसंगावधान दाखवणाऱ्या वैमानिकामुळे मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला. नागपूरहून कोलकात्याकडे रवाना झालेल्या इंडिगोच्या ६ए८१२ विमानाला उड्डाणानंतर लगेचच एका मोठ्या पक्ष्याची धडक बसली. यामुळे विमानाचा पुढील भाग नुकसानग्रस्त झाला.

घटना लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ हवाई नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि परवानगी घेऊन विमान परत नागपूर विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरवले. या विमानात २७२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.१० वाजता इंडिगो एअरलाइन्सचे विमान नागपूरहून कोलकात्याकडे निघाले होते. मात्र पक्षाची धडक बसल्यानंतर तातडीने आकस्मिक लँडिंग करण्यात आले. नंतर अर्ध्याहून अधिक प्रवाशांनी तिकिट रद्द केले, तर ५२ प्रवाशांना इंडिगोच्या सकाळी ९.१५ च्या नागपूर- दिल्ली-भुवनेश्वर-कोलकाता विमानाने रवाना करण्यात आले.

विमानतळाच्या परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पक्ष्यांच्या धडकीची ही घटना एअरलाइन्ससाठी गंभीर मानली जात असून नागपूर विमानतळ व नागरी विमान वाहतूक विभागाने चौकशी सुरू केली आहे. नेमकी परिस्थिती कशी निर्माण झाली याचा तपास सुरू असून या घटनेनंतर विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

विमानातील प्रवासी माजी आ. सुधाकर कोहळे म्हणाले, विमान सकाळी ७.१० वाजता आकाशात झेपावले. थोड्याच वेळात विमान पुन्हा नागपूर विमानतळावर उतरत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. विमान सकाळी ७.४५ वाजता धावपट्टीवर सुखरूप उतरले. सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पक्षी धडकलेला विमानाचा समोरील भाग नुकसानग्रस्त झाल्याचे दिसले. विमानात क्रू सदस्यांसह २७२ जण प्रवासी होते. यामध्ये गोपाल चांडक, शेखर भोयर, नितीन कुंभलकर, खेळाडूंची २५ जणांची टीम आणि अन्यचा समावेश होता.

Web Title: Bird hits plane; Pilot's quick action saves 272 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.