'शालार्थ'मधील 'मोठा मासा' जाळ्यात; शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर अटकेत; कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:14 IST2025-12-24T16:09:38+5:302025-12-24T16:14:12+5:30
Nagpur : 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक केली आहे.

'Big fish' caught in 'Shalarth'; Education officer Ravindra Katolkar arrested; Accused of swindling crores
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक केली आहे. नागपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यांना वर्धा येथून अटक करण्यात आली असून, हे प्रकरण थंडबस्त्यात गेल्याची चर्चा करणाऱ्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
ऑनलाइन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडन सरू आहे. या प्रकरणात यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांची सुरुवातीला चौकशी झाली होती. त्यांना अटकपूर्व जामीनदेखील मिळाला होता. काटोलकर हे अगोदर भंडारा येथे कार्यरत होते. २४ डिसेंबर २०२१ला ते नागपुरात प्राथमिक म्हणून रूजू झाले.
शिक्षणाधिकारी २० मार्च २०२२पर्यंत ते जिल्हा परिषदेत असताना त्यांना अनेक शिक्षण व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची माहिती होती. परंतु, वेतन संबंधात शाळेकडून आलेल्या प्रस्तावाची कुठलीही शहानिशा न करता त्यांचे थकीत वेतन देण्याची प्रक्रिया राबविली. त्यातून त्यांनी शासनाची १२ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. नागपुरातून त्यांची यवतमाळला बदली झाली. त्यांचे राहणे वर्धा येथे होते. मंगळवारी पोलिसांच्या पथकाने तेथून काटोलकरांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सनावण्यात आली आहे.
अब तक... २७
शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २७ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक यांच्यासह सहायक शिक्षक, सहा लिपीक व कनिष्ठ लिपिकांचा समावेश आहे.