जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आळा घाला : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 23:53 IST2020-03-30T23:51:50+5:302020-03-30T23:53:21+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

जीवनाश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आळा घाला : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. यानिमित्ताने भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे सूक्ष्म नियोजन आवश्यक असून सर्वसामान्य कष्टकरी माणसाला या नियोजनात प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, इतर मागास प्रवर्ग विकास मंत्री विजय वडेट्टीवार, आ. दुष्यंत चतुर्वेदी, अॅड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘लॉकडाऊन’च्या काळात लोकांना रोजगार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील समस्या वेगवेगळ्या असून ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शहरावर अवलंबून आहे. दूध व भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंची विक्री कमी झाली आहे. अशावेळी नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी प्रशासनाने घरपोच अन्नधान्य पोहचवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना पटोले यांनी केल्या. सामान्य दुकानदार, रिक्षाचालक, पानठेलाधारक यांचा या वितरण व्यवस्थेत प्रामुख्याने समावेश असावा, असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात वैद्यकीय सेवेवर ताण निर्माण होणार असून शासकीय व्यवस्थेसोबतच खासगी डॉक्टर व परिचारिकांच्या सेवा घेण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
असंघटित कामगार व विस्थापितांची व्यवस्था युद्ध पातळीवर करा- पालकमंत्री
यावेळी पालकमंत्री नितीन राऊत यांनी साठेबाजावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच असंघटित कामगार व विस्थापित नागरिकांची व्यवस्था युद्ध पातळीवर करण्यात यावी. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ठेवावे. शहरातील काही स्वयंसेवी संस्था गरजूंना अन्नदान करतात. अशा ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. कम्युनिटी किचनमध्ये निर्जंतुकीकरण आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले.