लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाच्या वतीने रेल्वे लैंड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या (आरएलडीए) वतीने नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर महत्त्वाची विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ७हा ५२ दिवसांसाठी रेल्वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे अजनी रेल्वेस्थानकावरून रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर देखील विकासकामे करण्यात येणार असल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर ५ दिवस २ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु, याचा रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ बंद राहणार असल्यामुळे रेल्वेगाडी क्रमांक २२१३७ नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस ही बुधवार, शनिवार आणि रविवारी सकाळी ८.२९ वाजता सुटणारी गाडी, रेल्वेगाडी क्रमांक ११४०३ नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस ही मंगळवार, शनिवारी दुपारी ३.२८ वाजता सुटणारी गाडी आणि २२१४२ नागपूर-पूणे एक्स्प्रेस ही शुक्रवारी दुपारी ३.२५ वाजता सुटणारी गाडी अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्यात येणार आहे.
तर रेल्वेगाडी क्रमांक २२१३८ अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस ही सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता येणारी गाडी, ११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस ही मंगळवारी व शुक्रवारी सकाळी ११.२३ वाजता येणारी गाडी आणि २२१४१ पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही शुक्रवारी रात्री १२.४७वाजता येणारी गाडी अजनी रेल्वेस्थानकावर समाप्त होणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.