प्रवाशांनो लक्ष द्या... गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा

By नरेश डोंगरे | Updated: August 22, 2025 20:16 IST2025-08-22T20:16:14+5:302025-08-22T20:16:38+5:30

मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय : बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना होणार सोयीचे

Attention passengers... Garib Rath Express must stop at Malkapur station | प्रवाशांनो लक्ष द्या... गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा

Attention passengers... Garib Rath Express must stop at Malkapur station

नरेश डोंगरे - नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मलकापूर आणि परिसरातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नागपूर-पुणे–नागपूर दरम्यान धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्त्वावर असून, प्रवाशांचा प्रतिसाद बघून नंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेची गाडी क्रमांक १२११४/ १२११३ नागपूर-पुणे–नागपूर गरीब रथ एक्सप्रेसचा आतापर्यंत मलकापूर रेल्वे स्थानकावर थांबा नव्हता. त्यामुळे मलकापूर आणि परिसरातील नागरिकांना नागपूर तसेच पुण्याकडे जाण्या-येण्यासाठी अडचणीचे होत होते. त्यामुळे या दोन्ही गाड्यांचे थांबे मलकापूर स्थानकावर मिळावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून त्या भागातील नागरिक, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. ती विचारात घेऊन या दोन्ही गाड्यांना आता मलकापूर स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मलकापूरसह बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना रोज थेट नागपूर आणि पुणे या मोठ्या शहरांशी रेल्वेने रोज प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. रविवारी २४ ऑगस्टपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.
 

गाडीच्या थांब्याचे वेळापत्रक
गाडी क्रमांक १२११४ नागपूर ते पुणे गरीब रथ एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर २४ ऑगस्टपासून रात्री ११ वाजून १७ मिनिटांनी पोहचेल आणि तेथून ११ वाजून १८ मिनिटांनी पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होईल.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२११३ पुणे ते नागपूर गरीब रथ एक्सप्रेस २५ ऑगस्टपासून मलकापूर रेल्वे स्थानकावर पहाटे ३ वाजून १४ मिनिटांनी पोहचेल आणि तेथून पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी नागपूरकडे निघेल. हा थांबा सध्या प्रायोगिक स्वरूपात देण्यात आला आहे. नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तरच हा थांबा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 

मलकापूरच्या नागरिकांना दिलासा
बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून मलकापूर स्थानकाची ओळख आहे. येथून रोज मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आणि नोकरदार मंडळी नागपूर तसेच पुण्याच्या दिशेने प्रवास करतात. त्यांना आतापर्यंत नागपूर किंवा पुणे गाठण्यासाठी भुसावळ, अकोला किंवा जळगाव यांसारख्या मोठ्या स्थानकांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे दोन्ही शहराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या गरिब रथ एक्सप्रेसचा हा नवीन थांबा मलकापूर आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे.

Web Title: Attention passengers... Garib Rath Express must stop at Malkapur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.